

दोडामार्ग : घोटगे येथे एका महिलेवर माकडाने हल्ला चढविल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यात ती गंभीर जखमी झाली असून वनविभागाने तिच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी. घोटगे येथील वन कर्मचारी शेतकर्यांशी अरेरावी करत असून त्याची बदली करावी व वन्य प्राण्यांनी केलेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, अशी मागणी शेतकर्यांनी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्याकडे केली.
वैद्यकीय अधिकार्यांकडून मेडिकल सर्टिफिकेट द्या. नुकसानभरपाई मिळण्यासाठी आम्ही तसा प्रस्ताव पाठवतो असे आश्वासन सुहास पाटील यांनी शेतकर्यांना दिले.
घोटगे येथे माकडांनी उपद्रव माजविला आहे. हे माकड मनुष्यांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका महिलेवर माकडाने हल्ला चढविल्याची घटना घडली होती. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी महिला पळत असताना माकडाने मागून तिच्या पाठीवर झडप घातली.
यावेळी महिला दगडावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली. घरातील मंडळींनी तिला रुग्णालयात दाखल केले.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना शासकीय अनुदान मिळत असल्याने ते अनुदान या महिलेलाही मिळावे, यासाठी तिचे पती शंकर दळवी यांसह शेतकरी भरत दळवी, संदीप दळवी व शेतकर्यांनी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली.
ती महिला दररोज शेतात काम करायची. मात्र माकडाच्या हल्ल्याने ती अंथरुणाला खिळलेली असून तिच्या कुटुंबीयांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भरत दळवी यांनी केली.
घोटगे येथे कार्यरत वन कर्मचारी अरेरावी करत आहे. गवारेड्यांकडून शेत पिकांचे नुकसान झाल्याबाबत त्या वन कर्मचार्यास सांगितले असता तो थेट नुकसान भरपाई मिळणार नाही, असे शेतकर्यांना सांगतो. शिवाय पंचनामे करण्यास टाळाटाळ करून विलंब करतो. त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कर्मचार्याची तात्काळ बदली करा, अशी मागणी भरत दळवी व शंकर दळवी यांनी केली.