

कुडाळ : गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा विविधांगी सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. बाप्पाची आरास, सजावटीसाठी लागणारी तोरणे, फुलांच्या माळा, पडदे, झालर, इलेक्ट्रॉनिक्स तोरणे, लाईट्स, धूप, कापूर, अगरबत्ती यांसह गणेशोत्सवासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहे. साहित्य खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे.
सध्या घराघरांत बाप्पाच्या उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. श्री गणेश चतुर्थीच्या अगोदर चार दिवस खरेदीसाठी बाजारपेठेत नागरीकांची मोठी गर्दी होणार आहे. श्री गणेशमूर्ती शाळांमध्येही श्रींच्या मूर्तींचे रंगकाम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणवासीयांचा महाउत्सव श्री गणेश चतुर्थी सण बुधवार 27 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. सिंधुदुर्गात घराघरांत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. सध्या घराघरांत गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. घराची साफसफाई, रंगकाम, डेकोरेशन आदी कामे सुरू आहेत.
गणेश चतुर्थीच्या अगोदर चार दिवसांपासून दूरवर नेल्या जाणार्या श्रींच्या मूर्तीं शाळांमधून नेल्या जातात. त्यामुळे मूर्ती शाळांमध्ये गणेशमूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आहे.
गणेशोत्सवासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठांमध्ये दाखल झाले आहे. गणपती बाप्पांची आरास, सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे रंगीबेरंगी पडदे, झालर, रिंग फ्लॉवर, मखरे, विविध प्रकारच्या लाईटस, आकर्षक तोरणे, फुले, माळा, पताका, छत यांसह पूजा साहित्यात धूप, कापूर, अगरबत्ती, मोदक, फळे, विविध प्रकारचे फटाके आदीं साहित्य बाजारपेठांमध्ये दाखल झाले आहे. या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच हार्मोनिअम, तबला व पखवाज दुरूस्तीची कामेही जोरात सुरू आहेत. नवीन साहित्यही दाखल झाले आहे.
सजावटीच्या साहित्यांची ठिकठिकाणी दुकाने थाटण्यात आली आहेत. हे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरीकांची वर्दह वाढली आहे. माटवी साठी लागणारे साहित्य, भाजी, फळे तसेच अन्य साहित्य खरेदीसाठी गणेश चतुर्थी अगोदर चार दिवसांपासून बाजारपेठेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
कुडाळसह तालुक्यातील ओरोस, कसाल, पिंगुळी, माणगाव, कडावल, वालावल, नेरूर, पणदूर आदी ग्रामीण बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी नागरीकांची वर्दळ सुरू झाली आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबईकर चाकरमानी गणेशभक्त मोठ्या प्रमाणात मूळ गावी कोकणात दाखल होतात. यंदाही मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे व अन्य भागात नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी, गणेशभक्त गावी दाखल होणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. एसटी प्रशासनाकडून ज्यादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे आणि एसटी बसेसचे आरक्षण आधीच फुल्ल झाले आहेत. अनेक रेल्वे प्रवाशी वेटींग वर आहेत. बरेच चाकरमानी खासगी आराम बसेस व अन्य खासगी वाहनांनी गावी दाखल होतात. काही जण स्वतःची खासगी वाहने घेऊन गावी येतात, त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्याही वाढणार आहे.