

मळगाव : गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी शनिवारी कोकण रेल्वे गणपती स्पेशल ट्रेनने सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन पोहोचला असतानाच गणेश भक्तांत मोठा उत्साह दिसून येतो. मुंबईकर गणेश भक्त मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असणार्या गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल व्हायला सुरू झाले आहेत.
कोकण रेल्वेने मुंबईकर चाकरमान्यांसाठी गणपती स्पेशल ट्रेनची सुविधा सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होत आहेत. गणेशोत्सवावर गेले चार दिवस पावसाचे सावट होते. ते आता ओसरत आहे. त्यामुळे कोकणात गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वेने मुंबईकर चाकरमान्यांसाठी सोडलेल्या गणपती स्पेशल गाडीतून मुंबईकर चाकरमानी गणेश भक्त दाखल झाले. त्यांच्या चेहर्यावर गणेशोत्सव उत्सवाचे उत्साही भाव होते. सावंतवाडी रेल्वे स्टेशन मुंबईकर चाकरमान्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. गणेशोत्सवात रेल्वे स्टेशन परिसरात असणार्या रिक्षाचालक, हॉटेल व्यवसाय तसेच इतर व्यवसाय करणार्यांचा व्यवसाय मुंबईकर चाकरमान्यांमुळे समाधानकारक होणार असल्यामुळे चेहर्यावर उत्साह दिसत होता. सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने मुंबईकर चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवून खबरदारी घेतली आहे.