

ठाणे ः गणपती बाप्पांच्या आगमनला अवघे 8 दिवस उरले असल्यामुळे कोकणात बाप्पांच्या भक्तांना घेवून जाण्यासाठी चाकरमान्यांची लालपरीही सज्ज झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदर्ग, रायगड सह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागातून 2 हजार 671 बसेस सुटणार आहेत. आरक्षण केलेल्या भाविकांना वेळेत गावाकडे जाता यावे, त्यांना वाहतूककोंडीचा फटका बसू नये, यासाठी ठाणे विभागाने ठाणे, कल्याण, मीरा - भाईंदर, दहिसर येथून या जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.
जादा वाहतूकीसाठी ठाणे विभागाच्या 120 बसेस आहेत, तर नाशिकमधून 1,275, पुणे 750 आणि उर्वरित बसेस मुंबईतून मागविण्यात आल्या आहेत. गणपतीसाठी जाऊ इच्छिणार्या चाकरमान्यांना ग्रुपबुकींग आणि वैयक्तीक आरक्षणाची सोय एसटी महामंडळ करते. ग्रुपबुकींग केलेल्या बसमुळे गावापर्यंत पोहचता येत असल्याने चाकरमानी ग्रुपबुकींगला पसंती दिल्याचे पहायला मिळते. सुमारे 2 हजार 302 बसेस ग्रुपबुकींग पध्दतीने आरक्षित झाल्या आहेत.
राजकीय पदाधिकार्यांचीही चढाओढ
गणपतीसाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी लालपरी राजकीय पदाधिकारी आरक्षित करतात. त्यात शिंदे शिवसेना गट आणि भाजपचे पदाधिकारी आघाडीवर आहेत.
बसेस कुठून सुटणार ?
ठाणे - खारीगाव (90 फुट रस्ता), हायलँन्ड (कोलशेत), भुमीपुत्र मैदान (खारीगाव) आणि खोपट बसस्थानक
विठ्ठलवाडी - विठ्ठलवाडी आगार, रूणवाल गार्डन
याशिवाय बोरिवली, मुलुंड, भांडूप येथून ही वाहतूक होणार आहे.
ठाणे विभागातून सुटणार्या बसेस - 2,671
रत्नागिरी जिल्हा - 1200
सातारा, सांगली,कोल्हापूर - 265
सिंधुदुर्ग आणि रायगड साठी - 1206
गणेशोत्सवाच्या जादा वाहतूकीसीठी एसटी महामंडळाने अन्य आगारातून बसेस मागवल्या आहेत. प्रत्येक चालकाची अल्कोहोल चाचणी केली जाणार आहे. बसेसमध्ये तांत्रिक दुरूस्ती उद्भभवल्यास प्रत्येक मार्गावर फिरते दुरूस्ती पथक असणार आहे. प्रवाशांचा सुरक्षित व वेळेत प्रवास होण्यासाठी महामंडळ कटिबध्द आहे
सागर पळसुले, विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ