

खारेपाटण : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या ऐतिहासिक खारेपाटण गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा, या गेल्या सुमारे ४५ वर्षांपासून प्रलंबित असतेलया मागणीसाठी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने रविवार २७ सप्टेंबर रोजी विराट निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण येथे सकाळी १०.३० ते दुपारी २ वा. या वेळेत हा मेळावा होणार असल्याची माहिती कृती समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला समितीचे उपाध्यक्ष मंगेश गुरव, सचिव संतोष पाटणकर, सदस्य तथा सरपंच महेंद्र गुरव, पंचायत समिती सदस्य गुरूप्रसाद शिंदे, योगेश गोड़वे आदी उपस्थित होते. या निर्धार मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यासह सिंधुदुर्गातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या चार तालुक्यांतील एक हजारहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खारेपाटण तालुका झालाच पाहिजे, या मागणीला या मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा बळ देण्यात येणार आहे, दशक्रोशीतील ग्रामस्थांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.
खारेपाटण तालुक्याची मागणी जुनी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा अखंड जिल्हा असतानापासून ही मागणी करण्यात येत आहे. १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र, त्यानंतरही खारेपाटण तालुक्याची मागावी कायम राहिली. खारेपाटण येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. कांता आप्पा शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली दशक्रोशीतील नागरिकांनी यापूर्वी मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले होते.
त्यावेळी तत्कालीन महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी खारेपाटण येथे येऊन तालुका निर्मितीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर खारेपाटणाऐवजी वैभववाडी या नवीन तालुक्याची निर्मिती झाल्याने खारेपाटणच्या नागरिकांची मागणी प्रलंबितच राहिली
आजूबाजूच्या ५० ते ६० गावांचे प्रमुख केंद्र
खारेपाटण हे आजूबाजूच्या ५० ते ६० गावांचे प्रमुख केंद्र असून बाजारहाट, दळणवळण, शिक्षण, आरोग्य तसेच प्रशासकीय कामांसाठी या गावावर मोठ्या प्रमाणात नागरिक अवलंबून आहेत. खारेपाटणाला तालुक्याचा दर्जा मिळाल्यारा दशक्रोशीतील नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील तसेच प्रशासकीय कामांना गती मिळेल, असा दावा कृती समितीने केला आहे.
खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती सन २०१८ पासून असून १९८२ पासूनच्या तालुका निर्मितीच्या मागणीला पुन्हा व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. समितीच्या वतीने खारेपाटण तालुका निर्मितीचा परिपूर्ण प्रस्ताव सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मंत्रालय स्तरावर महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या निर्धार मेळाव्याला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यासह सिंधुदुर्गातील कणकवली, देवगड आणि वैभववाडी या चार तालुक्यांतील एक हजारहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खारेपाटण तालुका झालाच पाहिजे, या मागणीला या मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा बळ देण्यात येणार आहे, दशक्रोशीतील ग्रामस्थांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.