Sindhudurg News : खारेपाटण-भुईबावडा-कुरुंदवाड एसटी पूर्ववत सुरू करण्याची मागणी

कोरोना काळापासून बंद आहे फेरी; वैभववाडी व राजापूर तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय
Sindhudurg News
खारेपाटण-भुईबावडा-कुरुंदवाड एसटी पूर्ववत सुरू करण्याची मागणीNewsband Office
Published on
Updated on

वैभववाडी : खारेपाटण-भुईबावडा मार्गे कुरुंदवाड एसटी बस सेवा पुन्हा तातडीने सुरू करावी, अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही बस सेवा अद्याप पूर्ववत करण्यात आलेली नसल्याने खारेपाटण ते भुईबावडा परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, व्यापार तसेच अन्य कामांसाठी कोल्हापूरशी सातत्याने संपर्क असलेल्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यातून आर्थिक भुर्दंडासह वेळेचाही मोठा अपव्यय होत आहे.

खारेपाटण-कोल्हापूर-कुरुंदवाड ही एसटी बस गेली अनेक वर्षे या मार्गावर नियमितपणे धावत होती. त्यामुळे खारेपाटण, मोसम, केळवली, तिथवली, कोळपे, उंबर्डे, भुईबावडा, पाचल पंचक्रोशी, वैभववाडी तालुक्यासह राजापूर तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना कोल्हापूरला जाण्या-येण्यासाठी ही बस अत्यंत सोयीची ठरत होती. विशेषतः सकाळच्या वेळेत कोल्हापूरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, व्यापाऱ्यांना तसेच उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना या बससेवेचा मोठा आधार होता.

तळकोकणातील अनेक नागरिकांचे शिक्षण, आरोग्यसेवा आणि व्यापाराच्या दृष्टीने कोल्हापूरशी जुने व घनिष्ठ संबंध आहेत. उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरमध्ये जाणारे विद्यार्थी, विविध शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये कामानिमित्त जाणारे नागरिक तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांसाठी ही बस सेवा विशेष महत्त्वाची होती. सकाळी कोल्हापूरला जाणे आणि सायंकाळी पुन्हा खारेपाटण परिसरात परत येणे, अशी सोयीची व्यवस्था या बसमुळे उपलब्ध होती.

मात्र कोरोना काळात ही बस बंद करण्यात आली आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरही तिची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवाशांना वैभववाडी,करूळ घाट मार्गे प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.

विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि रोजच्या कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बसने थेट प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक ठिकाणी वाहन बदलावे लागते. परिणामी प्रवासाचा वेळ वाढत असून मानसिक व आर्थिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. तरी   खारेपाटण-भुईबावडा मार्गे कोल्हापूर-कुरुंदवाड ही पूर्वीची बससेवा पुन्हा सुरू करावी. तसेच करूळ घाटातून जाणाऱ्या काही एसटी फेऱ्या भुईबावडा घाट मार्गे वळवाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news