

कणकवली : गुरुवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास फोंडा घाटात फोंडा ते कोल्हापूरकडे जाणारा बारा टायरचा चिरे घेवून जाणारा ट्रक वळणावर एक्सेल तुटल्याने रस्त्याच्या मधोमध बंद पडला. त्याच दरम्यान कोल्हापूरहून फोंडाघाटकडे येणारा दुसरा मोठा ट्रक साईड देताना एक्सेल पिना तुटल्याने बंद पडला. दोन्ही ट्रक बंद पडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाली.
परिणामी वाहनांच्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या. जवळपास पहाटे 5.30 वा. पर्यंत ही वाहतूक ठप्प होती. घटना समजताच फोंडा चेक नाक्यावरील पोलिस श्री. गुर्हाडे व श्री. निकम घटनास्थळी गेले. जेसीबीद्वारे एका बाजूचा ट्रक साईडला करण्यात यश आले आणि एकतर्फी वाहतूक सूरू झाली. काळोख, धुके आणि पावसामूळे मोठी गैरसोय झाली.
सुमारे चार तास प्रवासी आणि पर्यटकांना गाडीत अडकून पडावे लागले. वाहतूक पोलिस श्री. गवस, श्री. लाड, श्री. इंगळे यांनी तातडीने धाव घेवून उपस्थित प्रवाशांच्या मदतीने पवन भालेकर यांच्या जेसीबीद्वारे वाहतूक एकतर्फी सूरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर पाच तासांनी वाहतूक कुर्मगतीने सुरू करण्यात यश आले.