

वेंगुर्ले : मासेमारी व्यवसायावर आपला उदरनिर्वाह असणार्या वेंगुर्ले तालुक्यासह मालवण, देवगड व विजयदुर्ग तालुक्याला लाभलेल्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर शुक्रवार एक ऑगस्ट पासून मच्छीमार मच्छीमारी हंगामात मासेमारीला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी मच्छीमारांनी आपल्या मच्छीमारी नौका मासेमारीसाठी समुद्रात उतरवण्याची तयारी केलीआहे. दरम्यान गतवर्षीच्या हंगामापेक्षा यावर्षीचा मच्छीमारी हंगाम चांगला जाण्याची आशा मच्छीमार बांधवांनी बाळगली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर 1 ऑगस्ट ते 31 मे पर्यंत मच्छीमारी हंगामात मच्छीमार मासेमारी करताना किनारपट्टी भागात राहून आपला उदरनिर्वाह मासेमारीवर करणार्या मच्छीमारांना एक जून ते 31 जुलै नंतरच्या मच्छीमारी बंदी नंतर मासेमारी व्यवसाय सुरू करण्याची प्रतीक्षा असते. यावर्षी मोसमी पावसाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार सुरुवात केल्यामुळे महत्त्वाचा मे अखेरचा हंगाम वाया गेला. या हंगामात मोठ्या प्रमाणात माशांना मागणी असूनही पुरवठा न झाल्यामुळे मच्छीमारांना नुकसान सहन करावे लागले.
पावसाळी हंगामात समुद्राच्या खाडीपात्रात मच्छीमारांनी आपल्या मच्छीमारी नौका सुरक्षित नांगरून ठेवलेल्या आहेत. त्या नौका खडीपात्रातून समुद्राच्या किनार्यावर आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मासेमारी बंदी कालावधीनंतर एक ऑगस्टला मासेमारीचा नव्याने हंगाम सुरू होणार आहे. या हंगामाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी आपली मच्छीमारी जाळी तसेच मच्छीमारी नौका यांची डागडुजी व दुरुस्ती करून ठेवली आहे. आता या मच्छीमारी नौका मासेमारीसाठी समुद्रात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे.
मासेमारी व्यवसाय सुरू करण्याची मच्छीमारांची प्रतीक्षा एक ऑगस्ट ला संपणार नवीन हंगामाची उत्सुकता लागली आहे. हवामानाची स्थिती स्थिर असेल तर हा हंगाम एक ऑगस्ट पासून सुरू होईल अन्यथा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु या वेळेचा हंगाम वेळेत सुरू होईल असे मच्छीमार जाणकारांचे मत आहे.
किनारपट्टी भागातील मच्छीमार एक ऑगस्ट पासून आपल्या मासेमारी व्यवसायाचा शुभारंभ करतील. तर काही मच्छीमार समुद्राला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात करणार आहे. शासनाने मासेमारी बंदी 31 जुलै पर्यंतच ठेवली असल्यामुळे खर्या अर्थाने मासेमारी हंगाम ऑगस्ट पासूनच सुरू झालेला असेल.
दरम्यान, मत्स्य विभागाने मासेमारी करणार्या मोठ्या व छोट्या नौकाधारकांना एक ऑगस्ट पासून सुरू होणार्या मच्छीमारी हंगामात मच्छीमाराने जीव रक्षकसाधनसामुग्रीचा उपयोग करावा. तसेच नका नयन उपकरणे नौकेवर सोबत ठेवावीत. सध्या प्रतिकूल हवामान असल्यामुळे समुद्रात जाणे टाळावे. ज्या मच्छीमारांकडे अपघात गटविमा नसेल त्याने त्वरित तो काढून घ्यावा. मत्स्य विभागाने हवामान विषयक दिलेल्या सूचनांचे मच्छीमाराने हानी टाळण्यासाठी वेळोवेळी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन लेखी पत्र द्वारे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.