

देवगड : देवगड- जामसंडे नगरपंचायतीचे सफाई कामगार दोन महिने पगाराविना काम करीत आहेत. या सफाई कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन दिले जात नसेल तर संबंधित मक्तेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना नगरसेवकांनी न. पं. सर्वसाधारण सभेत केली.
नगरपंचायत हद्दीतील बंद स्ट्रीटलाईट, हायमॅक्स टॉवर कार्यान्वित होणार नसतील, शहरातील कचरा संकलन वेळेत व नियमित होणार नसेल, तर स्वच्छता कर अथवा दिवाबत्ती कर घेण्यात येऊ नये. गेली तीन वर्षे ही स्थिती असून नागरिकांच्या मागणीनुसार ही कर आकारणी करण्यात येऊ नये, अशी सूचनाही नगरसेवकांनी केली. दरम्यान, ऐन गणेशोत्सवात सफाई कामगार व लघुनळयोजनेवरील कामगारांना पगार अथवा मानधन नसल्याने संबंधित सफाई कामगारांनी न. पं. कार्यालयासमोर ठाण मांडले.
देवगड- जामसंडे न. पं. सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी न. पं. सभागृहात झाली. उपनगराध्यक्षा मिताली सावंत, बांधकाम समिती सभापती शरद ठुकरुल, पाणीपुरवठा समिती सभापती प्रणाली माने, आरोग्य शिक्षण सभापती आद्या गुमास्ते आदी उपस्थित होते. गेली तीन वर्ष कचरा संकलनासह स्ट्रीटलाईट, हायमॅक्स टॉवरची समस्या वारंवार उद्भवत असून त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसारच न. पं. प्रशासनाने आरोग्य कर, स्वच्छता कर, दिवाबत्ती कर घेण्यात येऊ नये, अशी सूचना नगरसेवकांनी केली. गणेशोत्सवाकरिता आवश्यक नियोजन करण्याबाबत बैठक घेऊनही अद्यापही प्रशासनामार्फत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्ट्रीटलाईट, हायमॅक्स टॉवर तसेच स्मशानभूमीतील विद्युत सुविधा दुरुस्ती झाली नसल्याने सभागृहात प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.
स्वच्छतेबाबत क्यूआर कोड घरोघरी लावण्यात आले आहेत का? अद्यापही काही ठिकाणी हे लावण्यात आले नसून संबंधित मक्तेदाराला एनओसी देण्यात येऊ नये. प्रसंगी बिलही अदा करण्यात येऊ नये, अशी सूचना नगरसेवकांकडून करण्यात आली. नागरिक ऐन पावसाळ्यात अनियमित व अपुर्या प्रमाणात होणारा पाणी पुरवठ्याने, अनियमित घनकचरा संकलन व्यवस्थापनाने तसेच दिवाबत्तीबाबत वारंवार निर्माण होणार्या समस्यांमुळे हैराण झाले आहेत याकडे नगरपंचायत प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी सूचना नगरसेवकांनी प्रशासनाला केली.
नव्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष जागेवर मोजणी झालेले नसून योग्य माहिती सभागृहात देण्यात यावी, अशी सूचना बुवा तारी, नितीन बांदेकर यांनी केली. खुले क्षेत्र 58 गुंठे असताना जुन्या सातबाराच्या नोंदीप्रमाणे यात 32 गुंठे क्षेत्र रस्त्याखाली व उर्वरित 26 गुंठे क्षेत्रापैकी 10 गुंठे व 16 गुंठे असे दोन भाग करण्यात आले. या मागच्या उद्देश काय, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्य नाक्यावर खुल्या क्षेत्रात वाहतुकीला अडचण ठरणारे कंपाऊंड हटविण्यात आले. परंतु नजीकच राज्य परिवहन महामंडळाची असलेली कंपाउंड वॉल का हटवली नाही? ती कंपाऊंड वॉलदेखील तात्काळ हटविण्याबाबत देवगड एसटी आगाराशी पत्र व्यवहार करावा, अशी सूचना नगरसेवकांनी केली.