

सावंतवाडी : गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यात अव्वल आणि ‘सुजाण नागरिकांचा जिल्हा’ अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैराश्याचा विळखा पडत आहे का? दोन दिवसांपूर्वी एका युवकाने जीवन संपवल्याच्या घटनेने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात वाढत्या आत्महत्यांमुळे सुशिक्षित तरुणांमध्ये प्रचंड वैफल्य पसरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या गंभीर समस्येवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी तीव्र चिंता व्यक्त करत, यामागे बेरोजगारी आणि ड्रग्जचे रॅकेट असल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे.
डॉ. परुळेकर यांनी या आत्महत्यांच्या सत्रावर बोलताना प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, जिल्ह्यातील तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या का करत आहेत? त्यांच्यात हे वैफल्य का येत आहे? याला जबाबदार कोण? दहावी-बारावीत 100 टक्के निकाल लावणारा जिल्हा एकीकडे, तर दुसरीकडे त्याच तरुणांच्या वाढत्या आत्महत्या, हा विरोधाभास जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याकडे अडीच वर्षे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्रिपद होते. या काळात जिल्ह्यातील किती तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ मिळाले? किती नवे उद्योग उभे राहिले? याची आकडेवारी जाहीर करावी, असे आव्हान डॉ. परुळेकर यांनी दिले आहे. यामुळे रोजगार निर्मितीचे दावे किती पोकळ होते, हे समोर येईल. बेरोजगारीमुळे आलेले नैराश्य हेच या आत्महत्यांमागील प्रमुख कारण असल्याचा त्यांचा दावा आहे.
वाढत्या आत्महत्यांमागे बेरोजगारी, ड्रग्जचा विळखा आणि सामाजिक असुरक्षितता ही प्रमुख कारणे असल्याचे डॉ. परुळेकर यांचे मत आहे. या प्रत्येक समस्येची अनेक उप-कारणे असून, त्यावर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
सामाजिक अध:पतन ः डॉ. परुळेकर यांनी जिल्ह्यात ड्रग्जचा अवैध धंदा फोफावला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे ड्रग्जचे रॅकेट तरुणांना व्यसनाच्या गर्तेत ढकलून आत्महत्येस प्रवृत्त करत नाही ना? या अवैध धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे? याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच, जिल्ह्यातील अनेक महिला गोवा राज्यात वेश्या व्यवसायात अडकल्याचे विदारक चित्र मांडत, जिल्ह्याचे सामाजिक अध:पतन होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
चिंताजनक वाढ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ.
प्रमुख कारणे: प्रचंड बेरोजगारी आणि ड्रग्जचा वाढता विळखा ही आत्महत्यांमागील प्रमुख कारणे असल्याचा संशय.
राजकीय सवाल : केंद्रीय मंत्रिपद असूनही जिल्ह्यात रोजगार निर्मिती का झाली नाही, असा डॉ. परुळेकर यांचा प्रश्न.
ड्रग्ज रॅकेट : जिल्ह्यात फोफावलेल्या ड्रग्जच्या अवैध धंद्याला कोणाचा आशीर्वाद आहे, याच्या चौकशीची मागणी. आत्महत्या आणि महिलांचे शोषण सामाजिक आरोग्यासाठी धोक्याचे संकेत.
एकेकाळी बुद्धीजीवी आणि सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग आज आपली ओळख गमावत आहे. या गंभीर प्रश्नांवर केवळ चर्चा न करता तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.