

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील झाराप- शिरोडकरवाडी येथील भट पावणी शेताजवळील पायवाटेनजीक कुंपणावर तुटून लटकत असलेल्या वीजवाहिनीचा शॉक लागून गिरण व्यावसायिक प्रताप वासुदेव कुडाळकर (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला. देवपूजेसाठी फुले काढण्यासाठी जात असताना शुक्रवारी सकाळी 8.15 वा. या सुमारास ही दुर्घटना घडली.
प्रताप कुडाळकर हे नेहमीप्रमाणे शेतात देवपूजेसाठी लागणारी फुले काढण्यासाठी गेले होते. दुर्दैवाने या वाटेवर तुटलेली जिवंत वीजवाहिनी लगतच्या कुंपणावर लटकत पडली होती. कुडाळकर चालताना या वीजवाहिनीला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, वडील बराच वेळ घरी न परतल्याने त्यांचा मुलगा त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला असता त्याला वडील शेतात पडलेल्या स्थितीत आढळले. घटनेची माहिती मिळताच कुडाळचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण धडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी ग्रामस्थांनी जीर्ण वीजवाहिन्या, पोल बदलणे, तसेच ट्री कटिंग तत्काळ करून मिळावे, अशी मागणी केली. महावितरणच्या नियमाप्रमाणे आर्थिक साहाय्य कुडाळकर कुटुंबीयांना देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.