

कुडाळ : अवैध वाळू वाहतूक तपासणीदरम्यान डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला असता डंपर कारवर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निखिल नितीन परब (रा. चौके-कुळकरवाडी, ता. मालवण) याच्यावर कुडाळ पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तर वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी निखिल परब याच्यासह तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करणयात आला आहे.
आप्पासाहेब जगन्नाथ मदने ( रा.चौके -मालवण) व संजय डिचोलकर (रा. आंबेरी- मालवण)अशी त्यांची नावे आहेत. निखिल परब व आप्पासाहेब मदने यांना अटक करून वेंगुर्ले न्यायालयात हजर केले, असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अनधिकृत वाळू तपासणी दरम्यान एका डंपरचालकाने स्नेहल सागरे, भरत नेरकर, शिवदास राठोड तीन तलाठी असलेल्या कारवर डंपर घालण्याचा प्रयत्न करून या कर्मचार्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी साय. 5.15 वा घडली होती. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या घटनेचा अधिक तपास पोलीस दर्शन सावंत करत आहेत.