

सावंतवाडी : येथील मच्छी मार्केट रस्त्यावर रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे टाटा टेम्पो चालवणार्या एका चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिली. या अपघातात बुलेटसह एकूण चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वा. सुमारास घडली. या प्रकरणी चालक हरीश्चंद्र शिवशरण व टेम्पो मालक सुनील केळुसकर अश्या दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माठेवाडा- झिरंगवाडी येथील हर्षद सुनील मेस्त्री ( 21) हा आपल्या इतर तीन मित्रांसह जिमसाठी गेला होता. त्याने आणि त्याच्या मित्रांनी बुलेटसह तीन अन्य दुचाकी मच्छी मार्केटसमोर रस्त्यावर पार्क केल्या होत्या. त्याचवेळी, शिरोडा नाका येथे राहणारा हरीश्चंद्र शिवशरण (27) हा टाटा टेम्पो घेऊन भरधाव वेगाने जात होता. त्याने दारूच्या नशेत तेथे उभ्या चारही दुचाकींना धडक दिली.या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे टेम्पो मालक सुनील बळवंत केळूसकर (50, रा. माठेवाडा) याने चालक शिवशरण याला दारू पिऊन गाडी चालवण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिसांनी या दोघांवरही या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सहा.निरीक्षक श्री.शिंदे, उपनिरीक्षक सरदार पाटील, हवालदार मंगेश शिंगाडे, मंगेश धुरी, महेश जाधव, श्री. सावंत, अमित राऊळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांनी नुकसानग्रस्त लोकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची तक्रार घेतली. मद्यधुंद टेम्पो चालक व मालक यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची त्वरित वैद्यकीय तपासणी केली.या अपघाताचा अधिक तपास हवालदार श्री. शिंगाडे करत आहेत.