

दोडामार्ग : तिलारी-पाताडेश्वर येथे गोमांस वाहतूक संशयावरून झालेल्या मारहाण व कार जाळपोळ प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले दोडामार्ग नगराध्यक्षांसह पाच संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगळवारी सावंतवाडी न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते.
गुरुवार 25 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. त्या दिवशी दुपारी घाटमाथ्यावरून गोव्याला जाणारी कार वीजघर चेकपोस्टवर पोलिसांनी तपासणीसाठी थांबवली होती. त्यावेळी कारमध्ये पोलिसांना मांस आढळून आले.
पोलिस कॉन्स्टेबल परशुराम सावंत हे पुढील चौकशीसाठी कार दोडामार्ग पोलिस ठाण्यात आणत होते. त्यावेळी तिलारी पाताडेश्वर येथे काहींनी करत अडवत त्यातून गोमांस वाहतूक होत असल्याचा संशय घेत कार चालकाला बेदम मारहाण करत कार पेटवून दिली होती. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल परशुराम सावंत यांच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भाजपाचे दोडामार्ग नगराध्यक्ष व तालुका मंडल अध्यक्षांसह पाच संशयितांना अटक केली होती. शुक्रवारी त्यांना सावंतवाडी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी या संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. इतर संशयितअद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.