

दोडामार्ग : मंत्री भरत गोगावले यांनी खा. नारायण राणे यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केले आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही दोडामार्ग भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जाहीर निषेध व्यक्त करतो, असे भाजपा दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस व जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. युवामोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, शहराध्यक्ष राजेश फुलारी, चंदू मलिक, संजय सातार्डेकर, सुनील गवस, स्वप्नील गवस आदी उपस्थित होते. श्री. गवस म्हणाले, महायुतीच्या पक्षातील नेत्यांनी आपली विधाने अत्यंत विचारपूर्वक करावीत. महायुती यशस्वी करण्याची जबाबदारी एकट्या भाजपाची नाही. त्यामुळे सर्वांनी जीव्हेवर ताबा ठेवून संयमाने बोलावे.
राणेंच्या जिल्ह्यात येऊन राणेंवर बेताल वक्तव्य करणे मंत्री गोगावले यांना शोभत नाही. खा. राणेंमुळेच जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार निवडून आलेत हेही गोगावले यांनी विसरू नये. यापुढे आम्ही अशी बेताल वक्तव्य कधीच खपवून घेणार नाही आणि वेळप्रसंगी जशास तसे उत्तर देण्यात येईल असेही श्री. गवस यांनी स्पष्ट केले.
म्हापसेकर म्हणाले, मंत्री भरत गोगावले यांनी आमचे नेते नारायण राणे यांच्यावर जे वादग्रस्त वक्तव्य केल,े त्याचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे. मागील झालेल्या निवडणुकीत खा. नारायण राणे व आ. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीला शंभर टक्के यश प्राप्त झाले आहे आणि त्यांच्यावरच असे बेताल वक्तव्य करून महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम मंत्री गोगावले यांनी केला आहे. जर त्यांना स्वबळावर निवडणुका लढवायच्या असतील तर बिनधास्त लढवाव्यात. तुमच्यात किती ताकद आहे हे आम्हीसुद्धा बघतो, असे आव्हान देत भाजपला पोकळ धमक्या देऊ नका, महायुती टिकवण्याचे आमचे एकट्याचे काम नसून ते महायुतीतील सर्व घटक पक्षांचे आहे , सल्ला म्हापसेकर यांनी मंत्री गोगावले यांना दिला.