देवगड; पुढारी वृत्तसेवा : देवगड तालुक्यातील मोंड येथील कॉलेज ते गावठणकडे जाणारा सुमारे २०० मीटरचा रस्ता आज (दि.8) दुपारी ३.३० च्या सुमारास वाहून गेला. या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुमारे दोन वर्षापूर्वी झाले होते. या घाटीरस्त्याच्या बाजूला मुसळधार पावसामुळे सुमारे चार ते पाच फूटाचा चर पडली आहे. यामुळे तेथील माती पाण्याच्या प्रवाहामुळे नजीकच्या घरांमध्ये घुसली. जलजीवनच्या पाईपलाईनच्या अर्धवट कामामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप़ स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
देवगड तालुक्यात आज (दि.8) सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पहिल्याच पावसाचा फटका मोंड गावाला बसला. या गावातील मोंड कॉलेज ते गावठणकडे जाणारा सुमारे दीड कि. मी.चा डांबरी रस्ता मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी वाहून गेला आहे. रस्त्यावरील घाटीरस्ता अक्षरशः उखडून गेला आहे. या घाटीरस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः पाण्यात वाहून गेले आहे. या रस्त्यानजीक जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी गटारे खोदण्यात आली होती.
मात्र, हे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या गटारात पावसाचे पाणी अडून घाटीरस्ता उखडून गेला आहे. रस्त्यानजीक चार ते पाच फूटाचे चर पडले असून चराची माती पाण्याच्या प्रवाहाने घरांत घुसली आहे. वाडीकडे जाणारा हा घाटीरस्त्यावरून शेतकऱ्यांची कायमस्वरुपी ये-जा सुरू असते. परंतु वाहून गेलेल्या मातीमुळे या रस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे. या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला स्थानिक नागरिकांनी दिली आहे.