

Sindhudurg Devgad Mineral Survey
देवगड : देवगड तालुक्यातील गोवळ, सोमलेवाडी, पाटगाव, पेंढरीसह सात गावांमध्ये खनिज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या शोधकार्याच्या सर्व्हेला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा सर्व्हे तात्काळ थांबविण्यात यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.८) देवगड तहसीलदार रमेश पवार यांना दिले. तसेच ग्रामसभेत घेतलेल्या ठरावाची प्रतही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
गोवळ, सोमलेवाडी, पाटगाव, पेंढरी, पाळेकरवाडी, मणचे आणि महाळुंगे या गावांमध्ये खनिजसंदर्भात सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या परिसरात शेतकरी व बागायतदारांच्या मोठ्या प्रमाणावर आंबा व काजू बागायती तसेच शेती आहे. खनिज उत्खनन झाल्यास या बागायती व शेतीला मोठा धोका निर्माण होणार असून परिसरातील जैवविविधता व औषधी वनस्पतींवरही विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
सर्व्हे सुरू करताना प्रशासन अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व्हेला स्थानिकांचा तीव्र विरोध असून तो तात्काळ थांबविण्यात यावा, अशी ठाम मागणी सातही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे.
गुरुवारी संबंधित गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी तहसीलदार रमेश पवार यांची भेट घेऊन खनिज शोधकार्याच्या सर्व्हेला आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले. सातही ग्रामपंचायतींच्या वतीने स्वतंत्र निवेदने तसेच ग्रामसभा ठरावांच्या प्रती तहसीलदारांकडे सादर करण्यात आल्या.
हा सर्व्हे थांबविण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी, सिंधुदुर्ग तसेच जीओ मरीन सोल्युशन प्रा. लि. यांच्याशी पत्रव्यवहार करून सर्व्हेक्षणाचे काम तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणीही सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या मागणीची योग्य दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
यावेळी पाटगावचे सरपंच नीतेश गुरव, महाळुंगेचे सरपंच संदीप देवळेकर, पेंढरीचे सरपंच मंगेश आरेकर, तसेच दिनेश मेस्त्री, नाना गोडे, आत्माराम तोरसकर, सुभाष नवळे, सुवर्णा घाडीगावकर, अनंत गोडे, विश्वनाथ सोमले आदी उपस्थित होते.