

देवगड : देवगड-जामसंडे शहरांना पाणीपुरवठा करणार्या दहिबांव येथील पूरक नळयोजनेची पाईपलाईन ऐन गणेशोत्सवात फुटल्याने देवगड व जामसंडे शहरांचा पाणीपुरवठा चार दिवस बंद होता. यामुळे भर पावसाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली. गणेशोत्सवाच्या धामधुमीत एकीकडे पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न तर दुसरीकडे गणेशोत्सवादिवशी रात्री विद्युतपुरवठा खंडीत झाल्याने नागरिक त्रस्त झाले.
दहिबांव येथील पूरक नळयोजनेची जीर्ण झालेली पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने शहरवासियांचा पाणीप्रश्न गंभीर बनतो. ऐन गणेशोत्सवात ही पाईपलाईन सात ते आठ ठिकाणी फुटली. दुरूस्तीचे काम करण्यात आले. मात्र त्यासाठी तब्बल चार दिवस शहरवासीयांचा पाणीपुरवठा बंद राहिला. नागरिकांना पावसाळ्यात पाणी विकत घ्यावे लागले. सध्या घराघरात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले असून देवगड-जामसंडेमधील बहुतांशी नागरिकांना पाण्यासाठी नळयोजनेवरच विसंबून राहावे लागते. मात्र जीर्ण झालेली जलवाहिनी वारंवार फुटत असते व त्यामुळे वरचेवर पाणीपुरवठा बंद राहतो याची अनुभूती गणेशोत्सवात गणेशभक्तांना आली.
या उत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी आले असून उत्सवाचा सुरूवातीलाच त्यांना पाणीप्रश्नाची झळ बसली. त्यात दहिबांव येथेही वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असून यामुळे पंपींग करणेही अशक्य होत आहे. लोकप्रतिनिधी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप नागरिकांमधून होत आहे.
गणेशोत्सवातही वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरूच आहेत. उत्सवादिवशी रात्री 10 .30 वा. बंद पडलेल्या वीजपुरवठा पहाटे 2.30 वा. सुरू झाला. यामुळे सर्वांचीच झोप उडाली. गणेशोत्सवाचे नियोजन करूनही ते कागदावरच राहत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
दरम्यान या पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली असली तरी अजूनही दोन ठिकाणी लिकेज असून ती दुरूस्ती सोमवारी करण्यात येणार आहे. तोपर्यंत शहरवासीयांचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती न. पं. पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.