

देवगड : देवगड नळयोजनेची फुटलेली जलवाहीनी दुरुस्तीचे काम मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाले आणि पंपींग यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र दुसर्याच दिवशी बुधवारी दुपारी खाकशी साईमंदीर येथे पुन्हा जलवाहिनी फुटल्याने देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा बंद झाला. यामुळे देवगड-जामसंडेवासीयांच्या मागचे टंचाईचे शुक्लकाष्ठ संपत नसल्याचे चित्र आहे. पाईप लाईन फुटणचे प्रकार सातत्याने होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
दहिबांव नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती व सुधारणा कामासाठी जुलै महिन्यात विशेष अनुदान योजने अंतर्गत 9 कोटी 21 लाख रूपये मंजुर झाले. या कामाचा शुभारंभही करण्यात आला. या कामांतर्गत जीर्ण झालेली 8 किमी जलवाहिनी नूतनीकरणाचा समावेश आहे. मात्र अद्यापही जलवाहीनी नूतनीकरणाचे काम सुरू झालेले नाही. हे काम लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असून जलवाहिनी बदलण्याचे काम झाल्यास पाईप फुटीचे प्रमाण कमी होईल. यासाठी जलवाहिनी नूतनीकरणाचे काम सत्वर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान जलवाहीनी दुरूस्तीचे काम गुरूवार सकाळपासून सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दिली.
देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणार्या दहिबांव अन्नपूर्णा नळयोजनेची जलवाहिनी मंगळवारी तीन ठिकाणी फुटली होती. जलवालिनी दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. सायंकाळी काम पूर्ण झाल्यानंतर पंपिंग सुरू करण्यात आले. मात्र बुधवारी दुपारी 1 वा. सुमारास खाकशी- साईमदिर येथे जलवाहीनी पुन्हा फुटली व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. या नळयोजनेची जवळपास 8 किमी पाईपलाईन पूर्ण जीर्ण झाली असून ती वरचेवर फुटत आहे. ही पाईप लाईन दुरुस्तीसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत 9 कोटी 21 लाख रुपये निधी मंजूर असून या कामामध्ये नवीन पंपिंग यंत्रणा, मोटर, तसेच पाईपलाईन बदलणे आदी कामांचा समावेश आहे.त्यापैकी पंपिंग व मोटर यंत्रणा हे काम पूर्ण झाले आहे तर नवीन बदलण्यात येणार्या पाईपलाईनसाठी पाईप आले आहेत, मात्र पाईप बदलण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.