

ओरोस : सिंधुदुर्ग बँक ही शेतकर्यांची बँक आहे. कर्ज वाटप केल्याशिवाय कुठलीही बँक नफ्यात येत नाही. त्यामुळे नाबार्ड व सहकार खात्याच्या धोरणानुसार जिल्ह्यातील नवीन उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी कर्ज वाटप केले जात आहे. मात्र काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी बँकेची बदनामी करत आहेत, असा आरोप सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला.
सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग बँक प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संचालक विठ्ठल देसाई, दिलीप रावराणे, महेश सारंग, गजानन गावडे, नीता राणे, समीर सावंत, बाळा मोरये, आत्माराम ओटवणेकर, बाबा परब, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व बँक अधिकारी उपस्थित होते. मनीष दळवी म्हणाले, बँकेकडून नाबार्ड व सहकार खात्याच्या नियमानुसार कर्ज वितरण केले जात आहे. वर्षभरात विविध संस्थांकडून
5 वेळा ऑडिट होते, त्यात चुका निदर्शनास आणल्या जातात, त्या 90 दिवसांत दुरुस्ती केली जाते. त्यामुळे सातत्याने बँकेला ऑडिट वर्ग ‘अ’ सातत्याने मिळाला आहे. सिंधुदुर्ग बँक गेली 17 वर्षे खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी घौडदौड करत आहे. जिल्हा बँकेच्या सभासद असलेल्या सर्वांनी मागच्या अनेकवेळा खा. नारायण राणे यांच्या विचाराच्या पॅनेलला साथ दिली आहे.
त्याचे कारण खा. नारायण राणे यांचा या बँकेच्या कारभारावर आणि प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असतो. कुठलीही चुकीची गोष्ट बँकेच्या कारभारामध्ये होवू नये, याबाबतीत ते नेहमी दक्ष असतात. याची जाणीव जिल्हावासीयांना असल्यामुळेच पुन्हा पुन्हा नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या लोकांना बँकेत संधी सभासद देत आहेत. मी चेअरमन म्हणून कार्यरत असताना तेव्हापासून मागची 4 वर्षे राणेंनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि माझ्यासोबत उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि सहकारी संचालक, काही संचालक वेगवेगळ्या पक्षातून सुद्धा निवडून आलेले आहेत.
बँक म्हणून काम करत असताना सर्व संचालक मंडळ एकमताने आणि एका भूमिकेने आणि धोरणानुसार काम करत आहोत. राणेंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सगळे निर्णय त्याच्या निर्दशनास आणूनच निर्णय घेतले जातात. नारायण राणेंची नेहमी एक भूमिका राहिलेली आहे की, या जिल्ह्यातल्या बेरोजगार, तरुणांना, उद्योजकांना सुद्धा घडवण्याचे काम या ठिकाणी शेतकर्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेने केले पाहिजे.
त्या द़ृष्टिकोनातून केंद्रात एमएसएमईचे मंत्री असताना सद्धा त्यांनी देशभरातील पहिली जिल्हा बँक ज्याला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजनांचा सुद्धा अॅप्लिकेबल करून दिले. या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योजक घडले पाहिजेत त्या द़ृष्टीने बँक प्रयत्न करत असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.