सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा
निगुडे येथील अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणावरून स्थानिक महिला ग्रामस्थ आक्रमक झाल्या असून, संशयित व्यक्तीच्या नावावर असलेल्या इमारतीमधील दुकान कायमस्वरूपी सीलबंद करून संबंधित इमारत निर्लेखन करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यांसर्भात महिला ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. अल्पवयीन मुलीशी संबंधित घडलेल्या या अत्यंत संवेदनशील घटनेमुळे संपूर्ण निगुडे परिसरासह तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक महिलांनी एकत्र येत प्रशासनासमोर आपली आक्रमक भूमिका मांडली.
संबंधित दुकान कायमस्वरूपी बंद करून इमारत निर्लेखन करण्याबाबत प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तातडीने पार पाडावी आणि निवेदनाची दखल घेऊन तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र उपोषण छेडण्यात येईल, असा ठाम इशारा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी दिला आहे.
निवेदन सादर करताना मौजे निगुडे येथील भाग्यलक्ष्मी मोरजकर यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होत्या. या संवेदनशील प्रकरणाची दखल घेऊन प्रशासन कायदेशीर बाबी पडताळून नेमकी काय कार्यवाही करते, याकडे संपूर्ण निगुडे ग्रामस्थांचे आणि तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.