

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांना शिवसेनेमध्ये पूर्वी कशी वागणूक मिळाली, हे त्यांनी आठवावे. कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा असला तरी, ते एक चांगले नेतृत्व आहेत, असे मत आ.दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख संजू परब, बाबू कुडतरकर, नीता सावंत कविटकर, अशोक दळवी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ‘महिलांच्या बाबतीत चुकीचे घडल्यास हात-पाय तोडा,’ असे केलेले वक्तव्य योग्य नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. महिलांसंबंधी कोणताही गैरप्रकार होऊ नये, पण त्यासाठी कायदा हातात घेणे योग्य नाही. अशा व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देणे अधिक योग्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर येथील माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा अभयारण्यात पाठवण्याच्या निर्णयाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबत नागरिकांच्या भावना आपण वनमंत्र्यांच्या कानावर घालू, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.
दोडामार्ग येथील रानटी हत्तींना वनतारा अभयारण्यात पाठवण्याबाबत पालकमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. हत्तींच्या संवर्धनासाठी तिलारी बॅकवॉटर परिसरात संरक्षक कुंपण घालून त्यांना तिथेच ठेवण्याचा पहिला पर्याय आहे, यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.