

मडुरा : दांडेली-पाडलोस मार्गावर मे महिन्यात दोन ठिकाणी करण्यात आलेल्या पाईप खोदाईच्या कामातील हलगर्जीपणामुळे सध्या रस्त्यावर मोठा चर पडून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तात्पुरती करण्यात आलेली डागडुजी आता निष्प्रभ ठरली असून चर खचल्याने वाहनचालक आणि पादचार्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक यांनी दिला आहे.
गेल्या मे महिन्यात दांडेली-पाडलोस या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी, रस्त्याच्या मधोमध दोन ठिकाणी चर खणून त्यात पाईप टाकण्यात आले. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. योग्यरित्या काम पूर्ण न केल्याने आता त्याची गंभीर परिणती समोर येत आहे. अनेक वेळा वाहने चरात आदळून अपघातही झालेत. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
पाईप टाकलेल्या ठिकाणची माती ढासळून खचल्याने रस्त्यावर धोकादायक चर तयार झाला आहे. या चरामुळे रात्रीच्या वेळी किंवा पावसात वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी समीर नाईक यांनी केली आहे.