

सावंतवाडी : मतिमंद मुलीवर चुलत काकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आई वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिस ठाण्यात संशयित मॅक्सी रॉबिन डिसोजा (48, रा. चिवार टेकडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता गुरुवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संशयित हा परदेशात कामास असून अलीकडेच तो तीन महिन्यांच्या सुट्टीवर गावी आला होता. त्याने अंगणात खेळत असलेल्या मतिमंद मुलीला आपल्या चिवारटेकडी येथील स्लॅबच्या घरात नेत अत्याचार केला. ही घटना शनिवारी घडली. दोन दिवस त्या मुलीला शारीरिक त्रास होऊ लागल्याने तिची आई वडिलांनी विचारपूस केली व डॉक्टरकडे नेत तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. यावरून आई -वडिलांनी मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
याप्रकरणी संशयित मॅक्सी रॉबिन डिसोजा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता गुरुवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास महिला पोलिस अधिकारी माधुरी मुळीक करीत आहेत.