

दोडामार्ग : मांगेली-फणसवाडी येथील 18 वर्षीय कॉलेज युवतीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. समीक्षा सुनील गवस असे या युवतीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या का केली, याबाबत सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.
समीक्षा गवस ही भेडशी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत बारावीच्या वर्गात शिकत होती. सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. त्यानंतर दुपारी ती घरी परतली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास घरातील मंडळींना ती छप्पराच्या लोखंडी रॉडला साडीने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली.
या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी रात्रीच मांगेली -फणसवाडी येथे जाऊन पाहणी केली. या प्रकरणी मृत तरुणीचे काका उमेश रामा गवस यांनी दोडामार्ग पोलिसांत खबर दिली. मंगळवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून काही व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. तिच्या आत्महत्ये मागे काही खास कारण असून, त्याबाबत सखोल तपास झाल्याशिवाय कारण सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. मृत समीक्षा हिच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे.