

सगुण मातोंडकर
सिंधुदुर्ग: शिरोडा-वेळागर समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या सात पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या पार्श्वभूमीवर‘दै. पुढारी’ ने ‘समुद्रातील धोक्यांचे गुढ’ या मथळ्याखाली तीन भागाची विशेष मालिका प्रसिद्ध करत समुद्रातील अंडर करंट, पर्यटकांच्या सुरक्षेबाबत असलेल्या त्रुटी व करावायाच्या उपाययोजना याचे विश्लेषण केले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्यासाठी निर्देश दत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश ग्रामविकास व नगरविकास विभागाला दिले.
या निर्देशानुसार सागरी पर्यटन सुरक्षात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून सागरी पर्यटनाला सुरुवात होते. या वर्षी पाऊस लांबल्याने यंदाचा सागरी पर्यटन हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. दरम्यान गेल्या आठवड्यात वेळागर समुद्रात सात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सागरी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. जिल्ह्यातील एकाही किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधन सामग्री व प्रशिक्षण मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
याबाबत ‘दै. पुढारी’ने वृत्त मालिका प्रसिद्ध करताच त्याची दखल सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने घेतली. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे, बोटींसाठी ‘सुरक्षित बोटिंग नियमावली’ बनवून प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करणे, पर्यटन हंगामाच्या कालावधीत पर्यटकांची संख्या जास्त असणाऱ्या सागरी पर्यटन किनाऱ्यावर सुरक्षा पथकांचे नियुक्ती करणे याबाबतचे शासन आदेश शासनाने निर्गमित केले आहे.
किनाऱ्यावरील सागरी पर्यटन अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील समुद्रकिनाऱ्यांसाठी ग्रामविकास विभाग आणि नागरी भागातील समुद्रकिनाऱ्यांसाठी नगरविकास विभाग अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम करणार आहे.
समुद्र किनाऱ्यांसाठी समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक व्यक्तींची नेमणूक करावी. समुद्रकिनाऱ्यावरील पोहण्याच्या ठिकाणी संरक्षक जाळी लावावीत, वाहन तळ निश्चित करावा, समुद्रकिनाऱ्या नजीक उद्योग असल्यास त्यांच्या सांडपाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया तपासावी, समुद्र किनारी स्वच्छता, घन कचऱ्याचे व्यवस्थापन, प्लास्टिक, टीन, काचेच्या बाटल्या संकलनासाठी सोय करावी, किनाऱ्यांवर माहिती व दिशादर्शक फलक लावावेत. पोहणाऱ्या पर्यटकांसाठी जीवन संरक्षण साधनांची उपलब्धता ठेवावी, समुद्रातील धोक्याची सूचना देणारी व्यवस्था (सायरन)बसवावी, समुद्रकिनाऱ्यावर प्रकाश व्यवस्था करावी. आपत्कालीन प्रसंगी प्रथमोपचारासाठी आरोग्य केंद्रांची माहिती ठळकपणे माहिती फलकावर लावण्यात यावी) तसेच जप उरश्रश्र ऊेलेीीीं, रुग्णवाहिकांची उपलब्धता करावी, किनाऱ्यावर टेहळणी मनोरे व फ्लड लाईट्स बसवाव्यात, या उपायोजना तातडीने कार्यान्वित करायचे आहेत.
या उपाययोजनांबरोबरच किनाऱ्यावरील भरती -ओहोटी तसेच खबरदारीच्या उपाययोजना दर्शविणारे डीजीटल बोर्ड तातडीने लावावेत. भरती-ओहोटीची माहिती देण्याकरिता टठ कोड तयार करून ते पर्यटकांना दिसतील अशा प्रकारे फलकांवर प्रकाशित करावेत. किनाऱ्यावर गर्दीच्या वेळी सुरक्षा पथकाची गस्त राहील याची खात्री करावी. आपत्कालीन संपर्क क्रमांक ठळकपणे दिसतील अशा रीतीने फलकांवर प्रदर्शित करून सदर फलक बिचेसवर लावावेत. समुद्रकिनारी कार्यान्वित करावी.
दिवाळी सणाच्या सुट्या लक्षात घेता जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यावर आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यावर आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना पुरविण्यात येतील याची दक्षता घ्यावी. समुद्रकिनारे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याचा पूर्तता अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.
दरम्यान, प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी सुरक्षिततेसाठी किनारपट्टी भागातील 11 गावांना रोबोटिक वॉटर क्राफ्ट दिले आहेत. त्यात वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा, वेळागर, सागरतीर्थ, उभादांडा, देवगड तालुक्यातून विजयदुर्ग, कुणकेश्वर व मालवण तालुक्यातील वायरी, भूतनाथ, तारकर्ली, काळेथर, देवबाग या गावांचा समावेश आहे. नियोजनाच्या अभावामुळे रोबोटिक वॉटर क्राफ्टचे लांबलेले प्रशिक्षण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तातडीने देण्यास सुरुवात झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा, सागरतीर्थ व शिरोडा वेळागर येथे सागरी सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.