पुढारी ऑनलाईन डेस्क : मालवण-राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, अंबादास दानवे यांनी पुतळ्याची पाहणी केली. त्याचवेळी नारायण राणे आणि निलेश राणे पाहणीसाठी किल्ल्यावर पोहचले. त्यामुळे भाजप आणि मविआ कार्यकर्ते आमने-सामने आल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
किल्यामध्ये आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील होते. तर बाहेर खासदार नारायण राणे, निलेश राणे आणि भाजपचे कार्यकर्ते होते. पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता निलेश राणेंनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. यावेळी भाजप आणि राणे समर्थकांनी मुख्य रस्ता आडवला. आदित्य ठाकरे यांनीही गेलो तर मुख्य रस्त्यानेच जाणार, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला. राणे आणि ठाकरे यांच्याकडून आव्हान-प्रतिआव्हान सुरू झाल्याने जयंत पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही स्थानिक आहे, पहिले त्यांना मागच्या दाराने जायला सांगा, असे निलेश राणे यांनी भूमिका घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी घटना आहे. याप्रकरणी संबंधीत मंत्र्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. जगभरात समुद्र किनाऱ्यावर अनेक पुतळे आहेत. कामात हलगर्जीपणा करणारे शिल्पकार जयदीप आपटे कुठे आहेत? त्याला येथून पळून जायला कोणी मदत केली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला पाहिजेत. महाराष्ट्रात जे काही घडेल त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.