

कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमी कुडाळ प्रस्तुत आणि उमेश पाटील निर्मित ‘तारका... नृत्याचा सुरेख प्रवास’ या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कुडाळ मराठा समाज हॉलमध्ये या कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. रसिकांच्या उदंड उपस्थितीत सादर या नृत्य कार्यक्रमाने जिल्ह्यातल्या नृत्य कलाकारांचे टॅलेंट अधोरेखित केले. एक दर्जेदार कार्यक्रमाचे साक्षीदार राहिल्याचा अनुभव उपस्थित रसिकांना आला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज पूजन आणि डॉ. योगेश नवांगुळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. अतुल बंगे, द्वारकानाथ घुर्ये, चिमणी पाखरंचे अध्यक्ष रवी कुडाळकर, सल्लागार सुनील भोगटे, उमेश पाटील, सौ.स्वाती पाटील, सचिन देसाई, श्री. पाटील, निलेश गुरव आदी उपस्थित होते. त्यांनतर सुरु झाला सुंदरी फेम सेलिब्रिटी नृत्यांगना दीक्षा नाईक सोबत 14 नृत्य कलाकारांच्या संचात तारकांचा प्रवास.
कलेची देवता नटराजाची महती आणि माहिती नृत्यातून उलगडत जात, कधी बॉलिवूड मधील गाणी, कधी लावणी, असा आकर्षक प्रकाश योजनेसह नृत्यमय प्रवास करून जय जय महाराष्ट्र माझा या गीतान कार्यक्रमाची उंची गाठली. यानंतर चौसष्ठ कलांचा स्वामी गणरायाला आणि नृत्य देवता नटराजला वंदन करून ‘तारकांनी’ कला सादर केली. नृत्याच्या माध्यमातून नृत्य देवता मुद्रेचा अर्थ नृत्याच्या माध्यमातून सांगण्यात आला. भारतीय आणि पाश्चात्य नृत्याचे विविध प्रकार सादर करण्यात आले. नृत्यांगना दीक्षा नाईक व सहकलाकारांनी सादर केलेले ‘सैय्या’ गाण्यावरचे नृत्य पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.
यानंतर ‘तारका’ शो चा एकमेव पुरुष कलाकार निखिल कुडाळकर याने ‘लल्लाटी भंडारं’ या गाण्यावर केलेल्या सादरीकरणामुळे वातावरणात उत्साह संचारला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतावर सादर केलेले नृत्य पाहून सर्वांचा उर अभिमानाने भरून आला. ‘तारका’ या शोच्या शीर्षक गीत व नृत्यावर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. दीक्षा नाईक, संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, दुर्वा परब, विशाखा धामापूरकर, तनिषा नाईक, सलोनी सावंत, अंतरा ठाकूर, प्राची जाधव, युक्ती हळदणकर, चिन्मयी सावंत, निधी केळुसकर, प्राची पाटकर, निखिल कुडाळकर या सिंधुदुर्गातल्या कलाकारांनी आपल्या सुंदर नृत्यांनी रसिकांना जागच्या जागी खिळवून ठेवले.
कार्यक्रमाच्या शेवटी निवेदक नीलेश उर्फ बंड्या जोशी यांनी चिमणी पाखर डान्स अकॅडमी, संचालक रवी कुडाळकर, सल्लागार सुनील भोगटे, ‘तारका’ शो चे निर्माते उद्योजक उमेश पाटील आणि सर्व कलाकारांचे कौतुक केले.‘तारका’ हा शो भविष्यात एक मोठा टप्पा गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.