

Sindhudurg Chhatrapati Statue
सिंधुदुर्ग : मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन रविवार, 22 जूनपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. आठ दिवसांपूर्वी पुतळ्याच्या चबुतर्यालगतची चिरेबंदी फरशीचा भाग खचल्याने त्याच्या डागडुजीसाठी सा. बां. विभागाने हा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रक सा. बां. सावंतवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. या कामासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे.
रविवार, 15 जून रोजी पुतळ्याच्या मुख्य चबुतर्यालगतची चिरेबंदी फरशीचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आले. यामुळे पुतळ्याच्या मजबुतीविषयी तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले. शिवप्रेमींमधूनही याबाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त होऊ लागला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सा. बां. कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोग यांना तात्काळ पुतळा परिसराची पाहणी करण्याचे निर्देश दिले.
यानुसार श्री. राजभोग यांनी सोमवार 16 जून रोजी पुतळा परिसराची पाहणी करत फरशी खचल्याने पुतळ्याच्या चबुतर्यास कोणताही धोका नसल्याचे जाहीर केले. दरम्यान सा.बां. विभागाच्या अधिकार्यांनी या खचलेल्या भागाची तात्काळ तात्पुरती डागडुजी केली होती. पालकमंत्री नितेश राणे यांनीही या फरशी कामाची दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले होते.
यानुसार सा.बां. विभागाने या फरशीचे दुरूस्ती काम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी 22 जूनपासून पुतळा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. आता पावसाळा असल्याने पर्यटकांचीही फारशी वर्दळ नसते. यामुळे दुरूस्ती कामही सावकाशपणे करता येणार आहे.