

दोडामार्ग : समोरुन येणार्या दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न करणार्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ती थेट ओहोळात कोसळली. या अपघातामुळे कारच्या मोडलेल्या मागच्या दरवाजातून चालक बाहेर पडला. यात तो किरकोळ जखमी झाला. दोडामार्ग शहरातील तलावाजवळ रविवारी दुपारी हा अपघात झाला.
साटेली भेडशी येथील एक युवक मारुती सुझुकी वॅगनार कारने रविवारी दुपारी दोडामार्गहून घरी परत जात होता. दरम्यान, शहरातील तलावाजवळील वळणावरत्याची कार आली असता समोरून एक दुचाकी कारच्या दिशेने येताना दिसली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने कार विरुद्ध दिशेला घातली. यावेळी कार नियंत्रणाबाहेर गेली व थेट वीस फूट खोल ओहाळात कोसळली.
घटनेनंतर कारचा मागचा दरवाजा उघडला गेला व इतर दरवाजे लॉक झाले. दरम्यान घडल्यानंतर मार्गस्थ होणार्यांनी बचावकार्य करण्यासाठी सरसावले. चालक मागच्या दरवाजाने बाहेर पडला. चालकाच्या गालाला व शरीराला किरकोळ दुखापती झाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला; मात्र अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.