Sindhudurg Sea Erosion | समुद्राने एका दिवसात १० मीटर रुंदीचा किनारा केला गिळंकृत; वस्तीच्या दिशेने लाटांचे आक्रमण: तळाशिलतील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली
उदय बापर्डेकर
Achara Talashil coastal erosion Sea Waves Hit Village
आचरा: समुद्र घरांपासून अवघ्या काही फुटांवर येऊन ठेपल्याने तळाशिल ग्रामस्थांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने तळाशील किनाऱ्याला त्याचा फटका बसला आहे. बंधारा नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्राच्या पाण्याचा तळाशील किनाऱ्याला तडाखा बसत आहे. समुद्राच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. बंधारा नसलेल्या भागात खाडी आणि सागर किनारा यांच्यातील अंतर काही मीटरचे राहिले असल्याने धोका वाढला आहे.
आज आलेल्या उधाणाच्या भरतीत सुमारे १० मीटर रुंदीचे किनाऱ्याचे क्षेत्र समुद्राने एका दिवसात गिळंकृत केले आहे. रत्याच्या कडेला असणारी सुरुची झाडे समुद्रात वाहून गेली आहेत. हे उधाण आणखी चार ते पाच दिवस राहणार असल्याने धोका वाढला आहे. वारंवार बंधाऱ्याची मागणी करूनही लोकप्रतिनिधी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाहणी करण्यासाठी आलेल्या पतन विभागाच्या सहाय्यक अभियंता समाधान जाधव यांना ग्रामस्थांनी आक्रमक होत रोखून धरले होते. जोपर्यंत उपाययोजना होत नाही, तोपर्यंत जाऊ देणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धरले रोखून
गेले चार दिवस सातत्याने येणाऱ्या उधाणा बरोबरच मंगळवारी सकाळी आलेल्या उधाणाचा वेग एवढा होता की, काही क्षणात तळाशील किनाऱ्याचा भुभागाचा लांबच लांब पट्टा गिळंकृत केला. ज्या भागास बंधारा आहे. तो भाग मात्र शिल्लक राहिला आहे. किनारा आणि रस्ता यामधील अंतर हे 10 फुटाचे शिल्लक राहिले आहे. सागरी लाटा तळाशीलच्या वस्तीच्या दिशेने आक्रमण करत आहेत. त्यामुळे तळाशीलवासीयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाहणी करण्यासाठी आलेल्या पतन विभागाचे सहाय्यक अभियंता समाधान जाधव यांच्यावर ग्रामस्थांनी आक्रमक होत प्रश्नाचा भडीमार केला. जोपर्यंत तातडीने उपाययोजना होत नाही, तोपर्यंत इकडून जाऊ देणार नसल्याचा पावित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. वरिष्ठांना बोलवा तातडीने उपाय योजना करा, अन्यथा इथेच थांबा. जोपर्यंत सक्षम अधिकारी येत नाहीत. तातडीची उपाय योजना हाती घेत नाहीत, तोपर्यंत तुम्हला जाऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती.
उधाण वाढत राहिल्यास मुख्य रस्ताही नष्ट होणार आहे. तळाशील ग्रामस्थ माजी सरपंच संजय केळकर, संजय तारी, संतोष कांदळगावकर, आनंद कोचरेकर, दत्तात्रय तांडेल, विद्याधर पराडकर, पुंडलिक टिकम, गणेश रेवडकर, विवेक रेवडकर, पांडुरंग तारी, प्रकाश बापर्डेकर, पोलीस पाटील जगदीश मुळे अन्य ग्रामस्थ मोठया संख्येने सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेऊन पहारा देत होते.

