

सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल सेवेबाबत येणार्या अडचणींचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी दूरसंचार कार्यालयावर धडक देत जाब विचारला. दूरसंचार मोबाईल सेवेत येणार्या समस्यांचा पाढा वाचत, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जन्नू यांना धारेवर धरले.
जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या ‘फोर जी’ यंत्रणा बसवण्याचे काम वेगाने सुरू असल्याने सध्या बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये अडथळे येत आहेत, अशी माहिती बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक रविकिरण जन्नू यांनी दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. वारंवार कॉल कट होणे, आवाज स्पष्ट न येणे आणि इंटरनेट व्यवस्थित न चालणे यांसारख्या समस्यांचा गेले 15 दिवसांपासून सामना करावा लागत असल्याचे शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकार्यांनी बीएसएनएलच्या गलथान कारभारावर टीका केली. जिल्ह्यात बीएसएनएलच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. इंटरनेट समस्येमुळे ग्राहक त्रस्त आहेत. याला जबाबदार कोण? खासगी मोबाईल कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का, असा सवाल त्यांनी केला.
यावर स्पष्टीकरण देताना जन्नू म्हणाले, बीएसएनएलद्वारे वापरली जाणारी यंत्रणा ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आली आहे, तर अन्य खासगी कंपन्या विदेशी बनावटीची यंत्रणा वापरतात. त्यामुळे त्यांना समस्या जाणवत नाहीत. यावर कार्यकर्त्यांनी ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी आवश्यक बदल करण्याची मागणी केली.
जिल्ह्यात ‘फोर जी’ सेवा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नवीन यंत्रणा बसवण्याचे काम चालू आहे. या कारणामुळे काही दिवस ग्राहकांना या अडचणींना सामोरे जावे लागेल. यासाठी त्यांनी ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन रविकिरण जन्नू यांनी केले.
या आंदोलनात जिल्हा संघटक शब्बीर मणीयार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहरप्रमुख निशांत तोरसकर, माजी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, आशिष सुभेदार, आबा केसरकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पदाधिकार्यांनी जन्नू यांनी हिंदी आणि इंग्रजीतून उत्तर देण्याचा प्रयत्न कला असता शिवसैनिकांनी त्यांना भाषेवरून फैलावर घेतले. ‘तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात, यासाठी तुम्हाला मराठी बोलता येणे आवश्यक आहे,’ असे सांगत शिवसैनिकांनी त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह धरला.