पालकमंत्र्यांच्या केसरी गावातील पुलाला भगदाड

बावळाट-केसरी मार्गावरील वाहतूक दोन दिवसांपासून ठप्प
Bawalat Kesari Bridge
बावळाट केसरी मार्गावरील पुलाला पुराच्या पाण्यामुळे भगदाड पडले आहे.file photo

सावंतवाडी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी निवासस्थानाकडे जाणाऱ्या बावळाट केसरी मार्गावरील पुलाला पुराच्या पाण्यामुळे भलेमोठे भगदाड पडले आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक गेल्या दोन दिवसांपासून ठप्प आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे पालकमंत्र्यांचाच मार्ग बिकट बनल्याचे दिसून आले. बावळाट गावचे ग्रामदैवत श्री सातेरी- माऊली मंदिरानजीक असलेला कमी उंचीचा पूल शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोमवारी सकाळपर्यंत पाण्याखाली होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रविवारपासूनच ठप्प आहे. सोमवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर या पुलाला भगदाड पडल्याचे दिसून आले. पुलाला भगदाड पडल्यामुळे या दोन्ही गावातील वाहनचालकांसह ग्रामस्थ व शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून बांदा - दाणोली जिल्हा मार्गा दरम्यान बावळाट येथून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी येथील निवासाकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा रस्ता आहे. ना. चव्हाण आपल्या निवासस्थानाकडून गोवा-मोपा विमानतळाकडे जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग करतात. प्रधानमंत्री ग्रामसडकच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि पूल वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. आठ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हा रस्ता करण्यात आला होता. त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता. सध्या या पुलासह जोडरस्त्यासाठी सा. बां. विभागा मार्फत सुमारे तीन कोटी रू. निधी मंजूर आहे. लवकरच पावसाळ्यानंतर या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news