

सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांदरम्यान काही ठिकाणी भाजप व शिवसेनेत वाद उद्भवले. पातळी सोडून आरोप-प्रत्यारोप झाले. यामुळे महायुतीबाबत गैरसमज निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आपण शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेत ठरल्यानुसार या पुढे भाजपा व शिवसेना एकमेकाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देणार नाहीत, महायुतीचे तीनही नेते नागपूर अधिवेशनादरम्यान एकत्र बसून यावर चर्चा करतील, तसेच निवडणूक काळत निर्माण झालेल्या कटुतेवर पडदा टाकून या पुढे महायुती म्हणून एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी दिली.
सावंतवाडी येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरपरिषद निवडणुकां दरम्यान अनेक ठिकाणी भाजप- शिवसेनेची युती झाली नव्हती. ही युती न होण्यास दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाला जबाबदार ठरवत जोरदार शाब्दीक वार केले होते. विशेषत ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात युती न होण्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण हेच कारणीभूत असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे कुडाळ- मालवणचे आ. नीलेश राणे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सावंतवाडी आलेले आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत या वादावर आता पडदा पडल्याचे सांगत महायुती यापुढे पूर्वीप्रमाणेच अभेद्य असल्याचे सांगितले.
महायुती सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार एकत्रित काम करत आहे. राज्याला 2029 पर्यंत प्रत्येक क्षेत्रात नंबर एक करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य ठेवले आहे, असे आ. चव्हाण म्हणाले. यावेळी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली मदत, मत्स्य व्यवसायाला दिलेला कृषीचा दर्जा, वाढवण पोर्ट, शक्तिपीठ महामार्ग, लाडकी बहीण योजना, पोलिस भरती आदी राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत या उपक्रमांच्या माध्यमातून राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत असल्याचे सागितले.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजीत देसाई, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, प्रसन्न देसाई,मनोज नाईक आदी उपस्थित होते.