

बांदा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धारगळ येथील दोन खांब जंक्शनजवळ बुधवारी दुपारी एसटी बस व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार सुदीप रवी पैकर ( 18, रा. नेरूळ) याचा जागीच मृत्यू झाला.
कोल्हापूरहून पेडणे मार्गे पणजीकडे जाणारी ‘हिरकणी’ एसटी बस (एमएच 14 क्यू 9753) ही धारगळजवळून जात असताना तिने दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडला आणि एसटी बसच्या चाकाखाली चिरडला गेला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, सुदीप पैकर मोबाईलवर बोलत असल्याने त्याचे लक्ष रस्त्याकडे नव्हते. याच दरम्यान भरधाव एसटी बसने मागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांनी पेडणे पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातस्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथे पाठवला.
मृत सुदीप पैकर हा नेरूळ येथील फ्रान्सिसको डिकोस्टा यांच्याकडे फलक जाहिरात व्यवसायात काम करत होता. कामानिमित्त तो धारगळ येथे आला होता. काम आटोपून घरी परतत असतानाच त्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर पोलिसांनी एसटी बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. यासोबतच अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात येत आहे.