

देवगड : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत बापर्डे ग्रामपंचायत सन 2019- 20 मध्ये विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. बापर्डे ग्रामपंचायतीने आतापर्यत विविध अभियानात यश मिळवले आहे.
निर्मल ग्राम पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार असे विविध पुरस्कार खडज मानांकन प्राप्त बापर्डे गावाने स्वच्छतेमध्ये सातत्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत. या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आतापर्यत राज्यातीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी भेटी दिलेल्या आहेत.
या यशात सर्वांचे सांघिक प्रयत्न महत्वाचे असल्याचे प्रतिपादन बापर्डे सरपंच संजय लाड यांनी व्यक्त केले. या यशाबद्दल गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी बापर्डे गावाचे अभिनंदन केले.
विभागात प्रथम क्रमांक प्राप्त बापर्डे ग्रामपंचायतीला विभागीय आयुक्त कोकण विभाग, कोकण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट रोजी 11 वा. आद्यक्रांति वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे पुरस्कार वितरण होणार आहे.