

बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केल्या जाणार्या बेकायदा दारू वाहतूक विरोधात बांदा पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल रु. 17 लाख 59 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रु.2 लाख 59 हजार 200 रुपयांची विदेशी दारू व रु.15 लाखांची इनोव्हा क्रिस्टा कार , याचा समावेश आहे. या प्रकरणी कणकवली तालुक्यातील चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे 6 वा.च्या सुमारास बांदा-शेर्ले पुलाजवळ करण्यात आली.
बांदा पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार सहा.पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा- आळवाडा रस्त्यावर सापळा रचला. यावेळी (एमएच 08 एजी 1221)ही इनोव्हा क्रिस्टा कार संशयास्पद जाताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीत गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या सीलबंद प्लास्टिक बॉटल्सचे एकूण 60 बॉक्स (48 बॉटल्स प्रत्येकी बॉक्स) आढळून आले.
यातील प्रत्येक बॉटलची किंमत सुमारे रु. 90 इतकी असून, एकूण रु. 2 लाख 59 हजार 200 इतक्या किंमतीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी राजकुमार श्रीकांत जाधव (20), अंकुर श्रीकांत जाधव (23), सोहम स्वप्निल पाताडे (21) आणि शुभम संतोष ठाकूर (22) (सर्व रा. कणकवली) या चौघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहा. पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश गवस, कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील आणि राजाराम कापसे यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल श्री.गवस करत आहेत.