

बांदा : बांदा-गांधी चौक परिसरात शनिवारी सकाळी अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाजारपेठेत लिंबाला टाचण्या टोचून, सोबत नारळ, हळद आणि कुंकू ठेवण्यात आल्याचे दृश्य पाहून दुकाने उघडण्यासाठी आलेल्या व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सकाळी 8 वा. च्या सुमारास काही व्यापारी आपली दुकाने उघडत असताना त्यांना रस्त्यावर लिंबू, नारळ आणि हळद-कुंकू ठेवलेले आढळले. विशेष म्हणजे लिंबांना टाचण्या टोचलेल्या होत्या. हे दृश्य पाहून अनेक व्यापार्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली. या प्रकारामुळे गांधी चौक परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘अशा पद्धतीने भानामती करून कोणाचा उद्देश साधायचा होता?’, ‘कोणी हे साहित्य ठेवले?’ असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाले आहेत. अनेकदा समाजात भीती आणि गैरसमज पसरवण्यासाठी अशा अघोरी कृत्यांचा वापर केला जातो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
व्यापार्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हे साहित्य कोण ठेवून गेला याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
अशा प्रकारच्या अघोरी गोष्टींना भीतीने बळी पडू नये. नारळ, लिंबू, हळद-कुंकू यामुळे कोणाचे वाईट घडत नाही, हे केवळ भीती निर्माण करण्याचे साधन आहे. अशा घटनांवर विश्वास ठेवण्याऐवजी पोलिसांना माहिती द्यावी आणि कायदेशीर मार्गानेच कारवाईसाठी सहकार्य करावे, असे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.