

बांदा : बांदा पोलिसानी बुधवारी दुपारी कट्टा कॉर्नर, बांदा येथे कारवाई करत सुमारे सहा लाखाची गोवा बनावट दारू जप्त केली. शहरातून जात असलेल्या एका कारची तपासणी करताना हे हे दारूचे घबाड सापडले. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील भूमेश नरसिंह इस्पी (39) व अजय कुमार अंजय्या गोपू (28) यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दारू वाहतुकीसाठी वापरलेली ताब्यातील कार तसेच ब्लेंडर्स प्राईड प्रीमियम व्हिस्की लेबल असलेल्या 81 प्लास्टिक बाटल्या (प्रत्येक 2 लिटर) किंमत 3 लाख 24 हजार) व रॉयल स्टॅग सुपीरियर व्हिस्कीच्या 92 प्लास्टिक बाटल्या (प्रत्येक 2 लिटर) किंमत 2 लाख 57 हजार 600 रू. अशी एकूण 5 लाख 81 हजार 600 रू. ची दारू व आठ लाखाची कार, असा एकूण 13 लाख 81 हजार 600 रू. चा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गजेंद्र पालवे, पीएसआय शिवराज झांजुर्णे, हेड कॉन्स्टेबल शेखर मुणगेकर, कॉन्स्टेबल अनिकेत सावंत व महिला हवालदार आदिती प्रसादी यांनी केली.