

बांदा : सावंतवाडीच्या दिशेने अवैध दारू घेऊन भरधाव जात असलेल्या क्रेटा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या ओमनी गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना मंगळवारी दुपारी3.15 वा. च्या सुमारास हॉटेल आनंद येथे घडली.
अपघातानंतर क्रेटा कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी संशयित चालका ओंकार अनिल गावकर (रा. खासगीलवाडी, सावंतवाडी) याला ताब्यात घेतले. क्रेटा कारही टोईग करून बांदा पोलिस ठाण्यात आणण्यात आली. तेथे तपासणी केली कारमध्ये विविध ब्रॅण्डच्या 80 बॉक्समध्ये भरलेला मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला.
जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे 2 लाख 5 हजार, तर चारचाकीची किंमत सुमारे 5 लाख असून, एकूण 7 लाख 5 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.सहा. पोलिस निरीक्षक गंजेंद्र पालवे, महिला हवालदार श्रीमती प्रसादी, हवालदार रामा तेली, सुशांत हिरलेकर, नेल्सन फर्नांडिस, राजेंद्र कापसे व श्रेया माळकर यांनी घटनास्थळी ंचनामा केला. या प्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात अपघात व अवैध दारू वाहतूक असे दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू आहे. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.