

आरवली : आरवली पंचक्रोशीतील सागरतीर्थ, सखैलेखोल, टेंबवाडी व न्हैचिआड येथील पाणथळ जागेत कमळांनी फुललेले विस्तीर्ण मळे पर्यटकांबरोबरच विविध पाणपक्ष्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनाच्या द़ृष्टीने ही सुखावह बाब आहे. या कमळांच्या मळ्यात विविध जातींचे पक्षीही विसावत असल्याने पक्षी निरीक्षक व अभ्यासकांना एक पर्वणी उपलब्ध झाली आहे.
कमळ हे राष्ट्रीय फूल आहे. हिंदू धर्मात आध्यात्मिकद़ृष्ट्या कमळ फुलाला महत्त्वाचे स्थान आहे. येथील फळाफुलांनी आणि पक्ष्यांनी जिल्ह्याचा पर्यटन हंगाम दरवर्षी बहरत आहे. त्यात भर टाकली आहे ती कमळ फुलांनी. आरवली पंचक्रोशीतील सागरतीर्थ, सखैलेखोल, टेंबवाडी आणि न्हैचिआड येथील दलदलीच्या आणि पाणथळ परिसरात एखाद्या चादरीप्रमाणे कमळांचे लांबच लांब मळे फुलले आहेत.
रेडी-रेवस सागरी महामार्ग आरवली पंचक्रोशीतून जातो. या मार्गावरून जाणारे पर्यटक या कमळ फुलांनी बहरलेल्या मळ्यांकडे पाहून भारावून जातात. कमळांचे नयन मनोहारी द़ृश्य पाहून त्यांना तेथे थांबण्याचा मोह आवरता येत नाही. या कमळ फुलांना गोव्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. गोवा राज्यातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये जरबेरा फुलांसारखा कमळ फुलांचाही वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या भागातील रहिवाशांनी या फुलांचा व्यापारी द़ृष्टिकोनातून वापर सुरू केल्यास त्यांना आर्थिक फायदा होईल.
कमळाची फुले, बी, कोवळी पाने व मुळे खाद्य म्हणून वापरली जातात. आशिया खंडातील काही देशांमध्ये कमळाच्या पाकळ्यांचा खाद्यपदार्थ सुशोभीकरणासाठी वापर केला जातो. कमळाची मोठी पाने खाद्यपदार्थ लपेटण्यासाठी वापरली जातात. बर्याच ठिकाणी कमळाच्या मुळांचा वनौषधी म्हणून वापर केला जातो. धार्मिक कार्यात तर या फुलाला अनन्य साधारण महत्व आहे. गणेश चतुर्थी, महालय, नवरात्र आणि मार्गशीर्ष महिन्यात काही स्थानिक लोक या फुलांची विक्री करून मोजक्या स्वरूपात पैसे कमावतात.
येथील दलदलीच्या आणि पाणथळ परिसरात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कमळे फुललेली दिसतात. या कमळांबरोबरच देशी व विदेशी पक्ष्यांनी सुद्धा हा परिसर फुलून गेलेला दिसतो. त्यामध्ये बदकांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. विशेषत: सोनपक्षी, कमळपक्षी, पाण कोंबडी, जांभळी पाणकोंबडी, कवड्या आदी दुर्मीळ पक्षी या परिसरात आढळून येतात. या फुललेल्या कमळांच्या मळ्यामध्ये हे पक्षी मनमुराद विहार करीत असतात.
कमळांचे विशेषत: निलमबो न्युसिफेरा, निलमबो ल्युटिया असे दोन प्रकार आहेत. इंडियन लोटस, सेकरेड लोटस, बिन ऑफ इंडिया लोटस या वेगवेगळ्या नावानींही कमळ ओळखले जाते. कमळाच्या बिया अनुकूल परिस्थितीत बर्याच वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. त्यामुळे दलदलीच्या भागात मोठा पूर आला किंवा दुष्काळ पडला तरी या बिया आपला जिवंतपणा टिकवून ठेवतात. त्यामुळे कदाचित गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील ठराविक दलदलीच्या ठिकाणी कमळांचे मळेच्या मळे फुलत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर पडत आहे.