

आरवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील आरवली येथील सर्व्हिस रोड लगतच्या गटाराचे काम घाईगडबडीत सुरु केले खरे, परंतु आता या गटाराच्या कामाला तडे जाऊ लागले आहेत. गटाराचे काँक्रिटीकरणही अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सर्व्हिस रोडवर व्यवस्थिरित्या पाणी मारण्यात येत नसल्याने धुळीमुळे प्रवासी जनता त्रस्त झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील सर्व्हिस रोडची दुरवस्था झाल्याने या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याने आंदोलनाला सामोरे जाऊ लागू नये, यासाठी आरवली येथील सर्व्हिस रोड गटारांचे काम घाईघाईने हाती घेण्यात आले आहे.
गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. गटाराच्या बांधकामतील खडी दिसून येत असल्याने काँक्रिटिकरणाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय गटाराच्या कामाला लेव्हलही नसल्याने गटार किती काळ टिकेल, याबाबत सशंकता निर्माण झाली आहे. गटाराच्या कामाला तडे जात असल्याने हे काम तोडून पुन्हा दर्जेदार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
आरवली येथील सर्व्हिस रोडवर दिवसातून चार वेळा पाणी मारण्याचे प्रशासनाने कबूल केले होते. कबूल केल्याप्रमाणे सर्व्हिस रोडवर पाणी मारण्यात येत नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे येथील जनता हैराण झाली आहे. जनतेला खोटी आश्वासने देऊन महामार्ग बांधकाम प्रशासन डोळ्यात धूळफेक करत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत.