

वैभववाडी : मानव विकास योजनेंतर्गत वैभववाडी तालुक्यात धावणार्या गाड्यांच्या अनियमितपणाकडे एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अ. रा. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी वैभववाडी बसस्थानकात धरणे आंदोलन करीत एस. टी.गाड्या रोखून धरल्या. अखेर आगार प्रमुख अजय गायकवाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन मागे घेतले. यापुढे एसटी बस अनियमित धावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी दिला.
मानव विकास योजनेअंतर्गत वैभववाडी तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पाच एसटी बस देण्यात आल्या आहेत. एसटी बस तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या महाविद्यालयाच्या वेळेनुसार सोडण्यात येतात. मात्र, गेल्या काही दिवसापासून या बस वेळेत येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या एसटी नियमित वेळेत सोडाव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी अ. रा. विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक यांनी कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी बसस्थानक येथे धरणे आंदोलन सुरू केले. बसस्थानकात विद्यार्थ्यांनी बस रोखून धरल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली आगार प्रमुख अजय गायकवाड, स्थानक प्रमुख प्रदीप परब, भागोजी चव्हाण, वैभववाडी वाहतूक नियंत्रक बाबू गुरखे हे वैभववाडी बस स्थानकात आले होते. त्यांनी कार्याध्यक्ष श्री. रावराणे यांच्याशी चर्चा केली.
मानव विकासच्या गाड्या या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी असताना त्या वेळेत सोडण्यात येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बस नियमित वेळेत विद्यार्थ्यांच्या सोईनुसार वेळापत्रक तयार करा, अशी सूचना श्री. रावराणे यांनी एसटीच्या अधिकार्यांना केली. तसेच वैभववाडी तालुक्यासाठी दोन जादा बस देण्याची मागणी केली. यावर डेपो मॅनेजर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यात आले असून, त्यानुसारच मानव विकासच्या एसटी बस सोडण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र पुन्हा वेळापत्रक कोलमडले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री. रावराणे यांनी दिला. संचालक शरद नारकर व शिक्षक उपस्थित होते.