

सावंतवाडी : सावंतवाडी-आंबोली रस्त्यावरील प्रसिद्ध धबधब्याजवळ उभारण्यात आलेली केबिनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंबोलीतील पर्यटन स्थळे सध्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
धो -धो कोसळणार्या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती पर्यटकांकडून प्रत्येकी 20 रुपये उपद्रव शुल्क वसूल करते. याच ठिकाणी समितीने एक पत्र्याची चौकी उभारली होती. या चौकीच्या काचांच्या खिडक्या काल रात्री अज्ञात व्यक्तीने दगड मारून फोडल्या. त्यामुळे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेबाबत सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पारपोली ग्रामपंचायत सदस्य संदेश गुरव यांनी दिली.