

सिंधुदुर्ग : बुधवारी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शासकीय दौरा सिंधुदुर्गात सुरू झाला असला तरी गेले दोन दिवस ते आंबोली या सिंधुदुर्ग जिल्हयातील हिलस्टेशन पर्यटनस्थळी कुटुंबियांसहित खाजगी दौर्यावर होते. दोन दिवस त्यांनी पर्यटन केले. विदेशातील पर्यटन स्थळांपेक्षाही आंबोली हे खूप सुंदर आहे अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला.
महसूल मंत्री म्हणाले, राहण्याची व्यवस्था कमी आहे. तिथे आता एमटीडीसीकडून प्रोजेक्ट सुरू आहे. आंबोली सारख सुंदर पर्यटनस्थळ महाराष्ट्रातही नाही. तिथे काही जमिनी विषयक प्रश्नांमुळे बांधकामांना अडचणी येत आहेत. खाजगी वने दाखवली आहेत त्यामुळे नियम व अटी कमी करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत जावू. तेथील तीन गावांमध्ये हा प्रश्न आहे, तेथील लोकप्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. तेथील जर बांधकामाचा प्रश्न सुटला तर पर्यटकांना राहण्याची व्यवस्था होईल आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील असे त्यांनी स्पष्ट केले.
आंबोली येथे महसूल मंत्र्यांचा खाजगी दौरा होता आणि या काळात त्यांनी तेथील बहुतांशी पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. आमदार दीपक केसरकर यांनी महसूल मंत्र्यांची तिथे भेट घेतली होती, त्याशिवाय तेथील सरपंच यांनीही महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेवून कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न मांडला होता. हे प्रश्न सोडविण्याचा शब्द महसूल मंत्र्यांनी त्यांना दिला आहे.