Amboli Forest Flying Frog | आंबोलीच्या जंगलात उडणारा बेडूक!

Night Forest Adventure | रात्रीच्या अद्भूत विश्वात पर्यटकांसाठी मेजवानी
Amboli Forest Flying Frog
हवेवर तरंगण्यासाठी या बेडकाच्या पायांच्या बोटांच्यामध्ये असलेला लाल रंगाच्या त्वचेचा पातळ पडदा.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

निर्णय राऊत

आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हा जैवविविधतेने समृद्ध भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे देश-विदेशातील अभ्यासक, तज्ज्ञ, वन्यजीव छायाचित्रकार तसेच पर्यटक मोठ्या संख्येने आंबोलीला भेट देतात. येथे पावसाळ्यात वन्यजीवांचे (जलचर व उभयचर) यांचे रात्रीचे अद्भूत विश्व प्रत्यक्षात पहाता येते. त्यातील सध्या मुख्य आकर्षणाचा केंद्र तथा जैवविविधतेतील साखळीमधील मुख्य घटक असलेला ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ (Malabar Gliding Frog म्हणजेच उडणारा बेडूक होय. याचे शास्त्रीय नाव - Rhacophorus malabaricus असे आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, दोडामार्ग, कोल्हापूर (काही भाग), चांदोली आदी भागात तो आढळतो.

या बेडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर उडी मारताना तो हवेत काही अंतर तरंगत जातो. हवेत तरंगण्यासाठी त्याच्या पायांची बोटे एकमेकांना त्वचेच्या पातळ पडद्याने जोडलेली असतात. त्याबरोबरच हवेत असताना शरीर एकदम सपाट आणि चपटे करून त्याचा उपयोग हवेवर असणारा पृष्ठभाग वाढविण्यासाठी करून हे सहजगत्या एक झाडावरून दुसर्‍या झाडावर तरंगत जातात. जणू पक्षाप्रमाणे हवेत उडतानाचे दृश्य असते.

Amboli Forest Flying Frog
Amboli Tourism | आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला प्रशासनाचे ग्रहण!

पश्चिम घाटात आढळणारा हा अनोखा बेडूक उभयचर आहे. आपल्या जीवनाच्या सुरवातीच्या काळातील पहिले काही टप्पे तो पाण्यात वाढतो आणि नंतरचे टप्पे जमिनीवर, झाडांवर व्यतीत करतो. इतर बेडकांप्रमाणेच हा वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने निद्रावस्थेत असतो. मान्सूनच्या आगमनानंतर सर्वसाधारणपणे जून महिन्यातील पहिल्या पावसात हे बेडूक जागे होतात आणि त्यांचे जीवनचक्र सुरू होते. हे दुर्मिळ जीवनचक्र आपण आंबोली सारख्या ठिकाणी प्रत्यक्षात सहज पाहू शकतो. मलबार ग्लायडिंग फ्रॉगच्या अभ्यासाठी विशेषतः देश विदेशातून वन्यजीव प्रेमी, अभ्यासक तथा छायाचित्रकार मोठ्या संख्येने भेट देत असतात. हा बेडुक जिथे आढळतो तो परिसर म्हणजे एक प्रकारे समृद्ध जैवविविधतेचा धोतक आहे.

Amboli Forest Flying Frog
Amboli Tourism | आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला प्रशासनाचे ग्रहण!

जीवनचक्र

या बेडका बद्दल पुणे येथील वन्यजीव तज्ज्ञ आदित्य नानिवडेकर सांगतात, या प्रजातीमध्ये पुनरुत्पादन सामान्यतः ऐन पावसाळ्यात म्हणजे जून-सप्टेंबर या महिन्यात होते. नर ओढ्यांच्या किंवा वाहत्या पाण्याच्या काठावर बसतात आणि मादीला आकर्षित करण्यासाठी मोठा आवाज काढतात आणि त्यांचे मिलन होते. त्यानंतर नर ओढ्याकाठी असलेल्या छोट्या झुडूपांची, झाडांची पाने शरीरातून निघालेल्या फेसापासून एकत्र करून, एका अर्थी चिकटवून ओबडधोबड घरटे बनवतो. बरेचदा काही नर एकत्र येऊन घरटे बनवताना दिसले आहेत. या फेसाच्या घरट्यात मादी समूहाने अंडी देते. एक घरट्यातील अंड्यांची संख्या ही 90 ते 210 पर्यंत असू शकते.

यानंतर नर मादी आणि घरटे सोडून जातात. अंडी ही रंगहीन किंवा थोडी पांढुरकी असतात. कालांतराने ही अंडी त्यांची वाढ पूर्ण करून टॅडपोल म्हणजे बेडुकमासा या अवस्थेत खाली असलेल्या पाण्यात पडतात. नंतर त्या पाण्यातच त्यांची पुढील वाढ होऊन मोठा बेडूक बनतो. या सर्व प्रक्रियेसाठी वाहते पाणी अत्यंत आवश्यक असते.

अतिशय आकर्षक अशा लक्षवेधी हिरव्या रंगावर याच्या पायांची बोटे लालसर - नारिंगी रंगाच्या त्वचेच्या पडद्याने जोडलेली असतात, जी सहज उठून दिसतात. त्यावर टपोरे, मोठे, थोडेसे वर आलेले डोळे, टोकदार नाक, पिवळट - पांढुरके पोट अशी त्याची सुंदर शरीरयष्टी असते. हा साधारण 10 सेंटीमीटर पर्यंत वाढतो. मादी ही नरापेक्षा थोडीशी मोठी असते. हे बेडूक निशाचर असतात, म्हणजे रात्री सक्रिय होतात. रात्रीच्या अंधारात, सदाहरित जंगलात ओढ्याच्या किंवा वाहत्या पाण्याच्या काठांवर यांचा मोठ्याने येणारा आवाज हा खळाळत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर उठून येतो. हा अतिशय अप्रतिम सुंदर दिसणारा प्रदेशनिष्ठ बेडूक हा आपल्या जंगलांची, विविधतेची शान आहे.

Amboli Forest Flying Frog
Amboli Tourism | आंबोलीच्या वर्षा पर्यटनाला प्रशासनाचे ग्रहण!

तर पावसाळ्यानंतर इतर बेडकांप्रमाणेच हा वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने निद्रावस्थेत असतो. अन् पुन्हा मान्सूनच्या आगमनाची वाट पहात असतो. तर आता पावसाळा सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, दोडामार्गसह कोल्हापुर (काही भाग) सारख्या ठिकाणी प्रत्यक्षात ह्या अद्भुत बेडकाला सहज पाहता येते. यामुळे पर्यटन व रोजगार यांच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

भारतातील पश्चिम घाट हा जगातील जैवविविधता हॉटस्पॉट (Biodiversity Hotspot) म्हणून ओळखला जातो. याच पश्चिम घाटात शंभराहून अधिक बेडकांच्या प्रजाती आढळतात. त्यातल्या बर्‍याचशा या प्रदेशनिष्ठ म्हणजे संपूर्ण जगात फक्त इथेच आढळणार्‍या आहेत. या सार्‍या प्रजाती जमिनीवर, जमिनीखाली, उंच झाडांवर, पाण्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जागांवर राहणार्‍या आहेत. प्रत्येकाचा आकार, रंग, आवाज आणि राहण्याची जागा वेगळी आहे. या सर्व प्रजाती आपल्या परिसंस्थेचा, निसर्गाचा महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहेत. नव्याने होणार्‍या संशोधनानुसार बेडकांचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. बेडूक हे जास्तकरून कीटकभक्षी असल्याने कीडनियंत्रण आपोआप होते. विविध बेडकांच्या अंगावरून स्त्रवणार्‍या रसायनांपासून होणारे अनेक फायदे संशोधनातून समोर येत आहेत. तसेच बेडूक हा निसर्गातील एक जैविक सूचक - Biological Indicator आहे. म्हणूनच त्यांचे, त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे.

आदित्य नानिवडेकर, वन्यजीव तज्ज्ञ, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news