

कुडाळ : पावशी-घावनळे रस्त्यावर आंबडपाल येथे दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी 11.30 वा.च्या सुमारास झाला.
एक मोटारसायकलस्वार मुळदेहून कुडाळच्या दिशेने येत होता, तर दुसरा मोटारसायकलस्वार कुडाळहून मुळदेच्या दिशेने जात होता. दरम्यान आंबडपाल पाटबंधारे विभाग कार्यालयानजीकच्या बसस्टॉप येथे दोन्ही मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही मोटारसायकलस्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. दोघांच्याही डोक्याला दुखापत झाली.
नागरिकांनी जखमींना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची नोंद सायंकाळपर्यंत कुडाळ पोलिसांत झाली नव्हती.