

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा
परराज्यातील काही खासगी बसेस गेले अनेक दिवस विना परवाना प्रवासी व मालवाहतूक करत आहेत. यामुळे भाड्यातील तफावत, ऑनलाईन बुकिंग, सिंधुदुर्गातील टप्पा वाहतूक आदी प्रश्नांवर खासगी बस एजंट, मालक व वाहतूकदार यांच्यातील वाद घुसमटत होता. यावर तोडगा काढण्यासाठी गोव्यातील बस मालक व सिंधुदुर्गातील लक्झरी बस एजंट यांची संयुक्त बैठक कसाल येथे झाली.
गोवा येथील खासगी बस मालक विजय शेठ, सुरेंद्र वायंगणकर, मंदार केळकर, श्री. सतीश, आदील खान, श्री. मुजावर आदी उपस्थित होते. ऑनलाईन बुकिंग, टप्पा वाहतूक, तिकीट दरातील तफावत, यात प्रवाशांचे होणारे गैरसमज, बस मालकांचे होणारे नुकसान यावर साधक-बाधक चर्चा करुन अनेक विषय सोडविण्यात आले. साधी बस, ए.सी. सीटींग बस, नॉन ए.सी. स्लीपर बस, ए.सी. स्लीपर बस यांचे दरपत्रक सर्व ट्रॅव्हल्सचे एकच असावेत, यावर एकमत होऊन दरांची टप्पेवारी निश्चित करण्यात आली.
ऑनलाईन सेवेपूर्वी खासगी एजंट गाड्यांचे बुकींग फोनद्वारे करत होते. सध्या वाढती महागाई, वीजबिले, दुकानगाळा भाडे यात प्रचंड वाढ झालेली असून, ऑनलाईन बुकिंगमुळे आज बस एजंटांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऑनलाईन बुकिंग सिंधुदुर्गातील एजंटांमार्फत झाले, तर एजंटांना कमिशन रुपी मोबदला मिळाला तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही. बस एजंट जगला पाहिजे यावर मालकांनी लक्ष देऊन एजंटांचे हित जपावे, याचा विचार गोवा राज्यातील बस मालकांनी करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
शासन मान्यता प्राप्त सिंधुदुर्ग बस बुकिंग संघटनेचे अध्यक्ष जयराज राणे (कुडाळ), उपाध्यक्ष उदय बांदेकर (कसाल), सचिव हेमंत दाभोलकर (बांदा), खजिनदार सुभाष मोरजकर (कडावल) व सदस्य दादा वाघ, महेश मोडक, पप्या पाटणकर, यादव, बाणे, गोट्या कांदे, अविनाश मर्तल, शिवा मांजरेकर, जुबेर, नाईक ट्रॅव्हल्सचे मालक आदींनी चर्चेत भाग घेतला.