

दोडामार्ग : आडाळी-कोसमवाडी येथील धोकादायक वळणावर दोन विचित्र अपघात झाले. मुसळधार पावसामुळे रस्ता ओला व निसरडा झाल्याने अनियंत्रीत झालेला एका मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या दरीत अडकला. त्यानंतर याच ठिकाणी एक बोलेरो पिकअप रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाली. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी हे दोन्ही अपघात झाले.
बांदा ते दोडामार्ग येणारा ट्रक आडाळी कोसमवाडी वळणावर आला असता वळणाचा अंदाज न लागल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक थेट रस्त्यालगतच्या दरीत अडकला. सुदैवाने मोठा अपघात टळला. ट्रक अपघाताच्या काही क्षणांतच बांदा ते दोडामार्ग येणारी बोलेरो पिकअप गाडीही त्याच रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाली. पिकअप रस्त्याच्या मधोमध उलटल्याने काही वेळ दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित यंत्रणांना माहिती दिली. काही वेळाने घटनास्थळी पोलिस दाखल झाले. क्रेनच्या साह्याने पिकअप रस्त्यावरून हटवून वाहतुकीसाठी एकेरी मार्ग मोकळा करण्यात आला.
या वळणावर यापूर्वीही अपघात झाले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मुसळधार पावसात आणि रात्रीच्या वेळी हे वळण अधिकच धोकादायक ठरत असल्याने येथे अपघात रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी होत आहे. शिवाय या ठिकाणी रस्त्याला बाजूपट्टी नसल्याने दोन वाहनांना बाजू देताना अडचणी येत असल्याने सा. बां. विभागाने यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.