कोकणात मुलांना लग्नासाठी मुलीच मिळेना! ‘मुंबईचाच नवरा हवा’ मुलींचा हट्ट | पुढारी

कोकणात मुलांना लग्नासाठी मुलीच मिळेना! 'मुंबईचाच नवरा हवा' मुलींचा हट्ट

सिंधुदुर्ग : गणेश जेठे : ‘मुंबईचा नवरा हवा’ हे फॅड आजही कोकणात कायम आहे. मुंबईपेक्षा गावात राहणारा मुलगा चांगले पैसे कमवितो आणि चांगला संसार करतो, हेही आता स्पष्ट झाले आहे. असे असतानाही गावात राहणाऱ्या ३० टक्के तरुणांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. समोर लग्नाचे मुहूर्त असताना आणि लग्नाचे वय उलटून जात असताना लग्नासाठी मुलगी कुठून आणायची, हा गंभीर प्रश्न अशा मुलांच्या पित्यांसमोर उभा राहिला आहे.

सरकारी नोकरी असली, तर मुलाचे लग्न लवकर जमते. बऱ्याचवेळा सरकारी नोकरीत असणारीच मुलगी मिळते. तलाठी मुलगा असेल, तर शिक्षिका किंवा ग्रामसेविका किंवा सरकारी कार्यालयातील लिपिक असणारी मुलगी लग्नासाठी तयार असते. परंतु, सरकारी नोकरी नसली तर मात्र सरकारी नोकरीत असणारी मुलगी अशा मुलांसोबत लग्नासाठी तयार नसते. कोकण म्हटलं की, एक काळ असा होता की लग्नासाठी मुली कमी नसायच्या, मुलगा- मुलगी बघायला आला की, अनेक प्रश्न विचारून मुलींच्या वडिलांना भंडावून सोडायचे. किंबहुना मुलीची बाजू कमकुवतच असायची. अगदी महाराष्ट्रात इतरत्र असे चित्र होते. त्यातून हुंडा घेण्याचे प्रकार घडायचे, आता हे सर्व बंद झाले आहे. हुंडा विरोधी कायद्यापेक्षा परिस्थितीनेच हंडा प्रथा बंद पाडली आहे. मुलगीच नाही तर हुंडा कसा मागणार? उलट या परिस्थितीमुळे आता मुलीचा पिताच मुलाच्या पित्यासमोर अनेक मागण्या ठेवू लागला आहे.

यावर्षीचा मे महिना लग्नाच्या मुहूर्ताविना

कोकणात तुळशीचा विवाह झाला की, लग्ने सुरू होतात. अलीकडे पावसाळ्यातही लग्ने होतात हे वेगळे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत खूप मुहूर्त होते. आता मार्च महिन्यात ३, १६, १७, २६, २७, ३० या तारखांना मुहूर्त आहेत. एप्रिल महिन्यात १, ३, ५, १८, २१, २२, २६, २८ या तारखांना मुहूर्त आहेत. दरवर्षी मे महिन्यात जास्त लग्ने होतात खरी परंतु यावर्षी मे महिन्यात १ व २ तारेखला मुहूर्त आहेत. ३ मेपासून २८ जूनपर्यंत लग्नाचा एकही मुहूर्त नाही.

अपेक्षांचा डोंगर वाढताच…

  • मुलगा मुंबईला राहतो का ?
  • तिथे त्याची स्वतःची खोली आहे का? कोणत्या भागात खोली आहे?
  • मुलाला चांगली नोकरी आहे का? पॅकेज किती आहे ?
  • मुलगा एकुलता एकच असावा.
  • नणंदेचे लग्न झालेले असावे.

दहा बाय दहाच्या खोलीत संसार…

मुलींना मुंबईचे खूपच आकर्षण आहे. गावी राहून शेतीत काम करण्यापेक्षा मुंबईला जाऊन तेथील झगमगाट, आसपास मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि मनोरंजनाची साधने याची भुरळ मुलींना पड़ते. त्यांना इथल्या जीवनापेक्षा मुंबईतील गजबजाट आकर्षित करतो. मुंबईचा नवरा करायचा आणि दहा बाय दहाच्या खोलीत संसार थाटण्याचे स्वप्न अनेक मुली पाहतात, म्हणून त्यांना मुंबईचा नवरा हवा असतो.

Back to top button